तीन मुलींना ठार मारून आई व आजीची आत्महत्या

कोची : ठार मारण्यापुर्वी मुलींना चांगले कपडे घातले; गॉगलही घातले. त्यानंतर तीन मुलींना ठार (Murder) मारून आई (Mother) व आजीने (Grand Mother) आत्महत्या करण्याची घटना केरळातील (Kerala) वडुथला, कोची (Cochim) येथे घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी (Kerala Police) सांगितले की, श्रीकुमारी साडी नेसली होती तर दोन लहान मुली चांगले कपडे घातलेल्या व गॉगल लावलेल्या स्थितीत ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत खाटेवर आढळल्या.
मोठी मुलगी दुसऱ्या खोलीत सूट परिधान केलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळली. तीन मुलींचा खून करून नंतर आई व आजीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृतावस्थेत आढळलेल्यांत असवथी नायर (३६ वर्षे), तिची आई श्रीकुमारी (५८ वर्षे) व १४, ४ व २ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. दोन्ही महिला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या तर तीन मुली घरातील खोल्यांत मृतावस्थेत आढळल्या.
पोलिसांना घटनास्थळी आत्महत्या केल्याचा नोट आढळला आहे. त्यात तणावातून जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार; असवथीच्या पतीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आत्महत्या केली होती. आरोग्य, दारूचे व्यसन व अन्य तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली होती. त्यावरून पतीच्या कुटुंबीयांनी असवथीला दोष देऊन सतावणूक सुरू केली होती.
पतीच्या निधनानंतर एक महिन्याने असवथीने आपली संपत्ती 'प्रोव्हीडन्स होम'ला द्यावी असे इच्छापत्र तयार केले होते. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
बऱ्याच दिवसांपासून त्यांचा आत्महत्येचा विचार सुरू होता, असा कयास पोलिसांनी एकूण माहितीवरून वर्तवला आहे. मूळ तिरुवनंतपुरम येथील विलाप्पीलसला येथील रहिवासी असलेले कुटुंब दोन महिन्यांपूर्वीच कोची येथे आले होते.
आपल्या मोठ्या मुलीच्या उपचारासाठी कुटुंब तेथे आले होते. पोलिसांना राहत्या घरात औषधे सापडली आहेत. पोलीस आता तपासाचा एक भाग म्हणून मुलीच्या वैद्यकीय स्थितीची माहिती घेत आहेत.
राहते घर हे भाडेपट्टीवर घेतले होते व लवकरच खाली करणार होती. मात्र, कुटुंबीय फोन घेत नसल्याने घर मालकाचे नातेवाईक पाहण्यासाठी आले असता एकूण प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडे असलेल्या चावीने घर उघडले असता मृतदेह सापडले. घरातील एसी सुरू होती तर एकूण स्थिती अंगावर काटा आणणारी होती.