इराण युद्ध लांबतेय; अघोषित लॉकडाऊनचा जगाला धोका

इंधन बचतीचे आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीचे जगाला आवाहन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इराण युद्ध लांबतेय; अघोषित लॉकडाऊनचा जगाला धोका

तेहरान :  अमेरिका- इस्त्रायल (USA-Israel) विरुद्ध इराण (Iran)  युद्ध (War) जसे वाढत चालले आहे तसे जगावर तेल व गॅसच्या तुटवड्याचे संकट अधिक गडद होऊ लागले आहे. सध्या तरी युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने; परिस्थिती आणखी कठीण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास जगात अघोषित लॉकडाऊन लागण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीने (आयईए) (IEA) जगातील सर्व देशांनी इंधन वापरात कपात करावी, असे आवाहन केले आहे.

कोरोना महामारीचा कहर सुरू झाल्यावर जगात पाच वर्षांपूर्वी प्रथम लॉकडाऊन लागले होते. एकूण परिस्थितीमुळे जग ठप्प झाले होते. इराण युद्ध वाढत चालल्याने व त्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या युद्धात तेलाचा शस्त्र म्हणून वापर करून दोन्ही बाजूने जगाला वेठीस धरले जात आहे. इराणने अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी जगातील २० टक्के तेल वाहतुकीचा मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे.

गॅस आणि तेल प्रकल्पांवर हल्ले करण्यात येत आहेत. हल्ल्यांमुळे आखाती देशांतील अनेक रिफायनरी बंद करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे भाव बॅरलमागे १००च्या वर गेले आहेत. युद्ध असेच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. आणि जगभर अघोषित लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. 

एकूण या स्थितीमुळे जगातील देशांना ऊर्जा बचतीचे आवाहन करीत आयईएने आधीच सावध केले आहे. संकट टळेपर्यंत जीवनशैली तात्पुरती बदलून ऊर्जेची मोठी बचत करू शकतो, असे स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी निर्बंधाचे पालन करून संकटावर मात करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले. आताही त्याच प्रकारच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत आयईचे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी व्यक्त केले.

जगाला आयईएचा सल्ला

शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम सुरू करावे, रस्ते, महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा कमी करा, सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा व पर्याय उपलब्ध असल्यास हवाई प्रवास टाळावा. वाहनांसाठी वापरला जाणारा गॅस स्वयंपाकाकडे वळवावा. स्वयंपाकासाठी इलेक्ट्र‌िकवरील आधुनिक साधने वापरावीत. प्रवासासाठी कार शेअर‌िंगचा पर्यावर वापरावा, असे आवाहन आयईएतर्फे करण्यात आले आहे. 

तेल-गॅसचे उत्पादन घटले

तेलाचे रोजचे उत्पादन सुमारे ११ दशलक्ष बॅरलनी घटले आहे. तेल संकटाच्या १९७३ व १९७९ च्या काळातील एकत्रित नुकसानीपेक्षा जास्त आहे. १० दशलक्ष बॅरलचे नुकसान या काळात झाले होते. नैसर्ग‌िक वायूच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर बनली आहे. गॅसचा पुरवठा सुमारे १४० अब्ज एवढा खंडित झाला आहे. हा नुकसानीचा आकडा रशिया- युक्रेन युद्धामुळे झालेल्या नुकसानीच्या दुप्पट आहे. यूएई आणि कतारमधून होणारी गॅस निर्यात थांबल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

हेही वाचा