अखिल गोवा लॉरी संघटनेची वाहतूक खात्याकडे मागणी

पणजीः जीएसटी (GST) लागू झाल्याने सीमेवर असलेले सर्व तपासणी नाके आता कसल्याच कामाचे नाहीत असा आदेश केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने जारी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारने (Government) गोव्याच्या (Goa) सीमेवर असलेले सर्व तपासणी नाके १५ दिवसांच्या आत काढून टाकावेत. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल गोवा लॉरी मालक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत च्यारी यांनी केली.
च्यारी यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी वाहतूक संचालकाची (Transport Director) भेट घेऊन याविषयी निवेदन सादर केले.
निवेदन दिल्यानंतर बोलताना च्यारी यांनी सांगितले की, वर्ष २०१७ मध्ये जीएसयी लागू झाल्यानंतर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये एक आदेश जारी करून राज्याच्या सीमेवर तपासणी नाक्यांची गरज नसल्याचे नमूद केले होते.
वाहने आणि चालकांसंदर्भातील सर्व डेटा वाहन आणि सारथी प्लॅटफॉर्मवर एकत्र करून ठेवला आहे. त्यासाठी तपासणी नाक्यांवर नियमीत तपासणीची गरज नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्यासाठी राज्यांच्या सर्व सीमेवर असलेले तपासणी नाके १५ दिवसांच्या आत काढून टाकावेत, अशी मागणी च्यारी यांनी केली.
रस्ते वाहतूक मंत्रालयाचे या विषयीचे निर्देश गोव्यासहीत १२ राज्यांत ६ सप्टेंबर २०२१ मध्ये वाहतूक सचिवांना पोहोचले आहे. या निर्देशात स्पष्ट म्हटले आहे की, २०१७ मध्ये जीएसयी लागू होऊन सर्वा डेटा वाहन आणि सारथी पोर्टलवर उपलब्ध असल्याने; तपासणी नाक्यांची आवश्यकता नाही, असे च्यारी यांनी सांगितले.
या निर्णयानुसार काही राज्यांनी वाहतूक तपासणी नाके काढून टाकले आहेत. त्यासाठी राज्यातील सध्याच्या तपासणी नाक्यांची स्थिती काय आहे ती मंत्रालयाला लवकर कळवावी, असे निर्देश मंत्रालयाने गोवा राज्याला दिल्याचे च्यारी यांनी सांगितले.