
पणजी : पणजी (Panjim) येथील बाजारात मानकुराद आंबे (Mango) पुन्हा दाखल झाले आहेत. लहान मानकुराद आंबा ३ हजार रुपये तर मध्यम आकाराचे आंबे ५ हजार रुपये डझन या दराने विकले जात आहेत. पणजी बाजारात (Market) सध्या काही ठराविक व्यापाऱ्यांकडेच मानकुराद आंबे विक्रीस उपलब्ध आहेत. पुढील पंधरा दिवसांत या आंब्यांची आवक वाढणार आहे. यामुळे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याआधी बाजारात फेब्रुवारी महिन्यातील काही दिवस मानकुराद आंबे विक्रीस आले होते.
बाजारात अद्याप हापूस आंबे दाखल झालेले नाहीत
सोमवारी पणजी बाजारात तोतापुरी आंबे २५० रुपये किलो दराने विकले जात होते. कैऱ्या १०० ला ४ ते ५ नग या दराने विकल्या जात होत्या. शेवग्याचे दर कमी झाले आहेत. बाजारात शेवग्याच्या शेंगा ५० रुपये ६ या दराने विकल्या जात आहेत. नारळ आकारानुसार ३० ते ५० रुपये नग होता. मागील आठवड्याच्या तुलनेत काही भाज्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
बाजारात लहान लसूण २०० रुपये तर मोठी लसूण ५०० रुपये किलो होती. आल्याचे दर १८० ते २०० रुपये किलो होते. कांदा आणि बटाट्याचे दर १० रुपयांनी कमी होऊन प्रत्येकी ४० रुपये किलो झाले. टोमॅटो ४० रुपये किलो होते. भेंडी, ढब्बू मिरचीचे दर प्रत्येकी २० रुपयांनी वाढून १०० रुपये किलो झाले. मिरचीचे दर २० रुपयांनी वाढून १२० रुपये झाले.
फ्लॉवर ५० रुपये नग या दराने विकला जात होता. तर कोबीचे दर ४० रू किलो होते. वांगी ६० ते ८० रुपये किलो होती. बाजारात वालपापडी दर्जानुसार ८० ते १२० रुपये किलो होती. काकडी ८० रू. रुपये किलो होती. मेथीची एक जुडी २५ रू. , पालक, कांदा पात प्रत्येकी १५ रुपये जुडी होते.
शेपू २५ रुपये तर कोथिंबीर ३० रुपयांना एक जुडी होती. फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा २३ रू., बटाटा २३ रू., टोमॅटो ३२ रू., वालपापडी ६९ रू. , मिरची ७० रू., भेंडी ४० रू. , गाजर ३१ रू. तर कोबी १८ रुपये प्रती किलो दराने विकली जात होती. फ्लॉवरच्या एका नगाचा दर २५ रुपये होता.