श्री ब्राह्मण भजनी सप्ताह ही ओशेल-भाटी, शिवोली गावची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख बनली आहे. श्रद्धा, भक्ती, सहकार्य आणि सामाजिक ऐक्य यांचा मिलाफ म्हणजे हा सप्ताह होय. शापोरा नदीच्या काठावर वसलेले श्री ब्राह्मण मंदिर सप्ताहाच्या वेळी पंढरपूरसारखे भासते.

सप्ताहाच्या आठ दिवसांत संपूर्ण गाव धार्मिक रंगात रंगलेला असतो. गावातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर यामध्ये सहभागी होते. मंदिर हे गावच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे. या आठवड्यात भजन, पूजन, अभिषेक, गाभाऱ्यातील सेवा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा अखंड ध्वनी निनादत असतो.
जाणकारांच्या माहितीनुसार या सप्ताहाची सुरुवात १८५० ते १९०० च्या काळात झाली असावी. तेव्हा गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती. ओशेल-भाटी येथे मोठी लाकडी जहाजे (ज्यांना बोली भाषेत ‘तारू’ म्हटले जायचे) पावसाळ्यात शापोरा नदीच्या काठी दुरुस्तीसाठी वर काढली जायची. यावेळी ओशेल भागातील ‘तारू’ व्यावसायिक कै. नारायण बाबली गारुडी हे घराच्या गच्चीवर (पहिल्या माळ्यावर) आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्री विठ्ठलाच्या भक्तीत रमत असत. काही वर्षांनंतर नारायण गारुडी यांच्या घरात गर्दी वाढू लागली. घराचा माळा लाकडी आणि भिंती मातीच्या असल्याने गर्दीमुळे घर कोसळण्याचा धोका होता. तेव्हा काही ग्रामस्थांनी हा सप्ताह जवळच्या श्री ब्राह्मण देवस्थानात स्थलांतरित करण्याचे सुचवले. कै. नारायण गारुडी यांनी मंदिरात सप्ताहाला प्रारंभ केला; पण सप्ताहाच्या समाप्ती दिवशी आपल्या घरातून ‘पार’ काढण्याची अट घातली. ग्रामस्थांनी त्याला होकार दिला. पुढे मंडप उभारून भजनाचा विस्तार झाला आणि नंतर भव्य, दिव्य आणि रम्य श्री ब्राह्मण देवस्थानचे मंदिर उभे राहिले.
पार आणि मानकरी : सामाजिक एकात्मतेचा आधार
गावातील सर्व घरे पार किंवा वंशांमध्ये विभागली गेली आहेत. प्रत्येक पारातील प्रमुख प्रतिनिधीला ‘मानकरी’ म्हणतात. हे सात पार आणि त्यांचे मानकरी असे :
१) रामतारी पार – श्री. रमाकांत चोडणकर २) गारुडी पार – श्री. वासुदेव गारुडी ३) पाणनाईक पार – श्री. दिगंबर मांद्रेकर ४) भैरे पार – श्री. राजेश कोचरेकर ५) पोळेकर पार – श्री. श्रीवल्लभ साळगावकर ६) भाकर्ये पार – श्री. हरिचंद्र ताम्हणकर ७) पेडणेकर पार – श्री. किशोर पेडणेकर. या मानकऱ्यांची सेवा व संयोजन सप्ताहाचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करते.
सप्ताहाचे स्वरूप आणि कार्यक्रम
आषाढी एकादशीनंतर दहाव्या दिवशी, म्हणजे आषाढ कृष्ण पंचमी या तिथीला सप्ताहाला प्रारंभ होतो. आठ दिवस आणि रात्र भजनांचा अखंड गजर सुरू असतो. स्थानिक कलाकारांबरोबरच राज्यातील व बाहेरून आलेले अनेक भक्त कलाकार कला अर्पण करतात. सातव्या दिवशी (शेवटच्या रात्री) गावातर्फे इतर राज्यांतून आमंत्रित केलेल्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
रामतारी पाराकडून सप्ताहाला प्रारंभ होतो आणि समाप्तीही त्यांच्याकडूनच होते. समाप्तीच्या दिवशी गारुडी व रामतारी पार देवस्थानापर्यंत विठ्ठल नामाच्या गजरात, वाजत-गाजत येतात. त्यांना इतर पार येऊन मिळतात. मंदिरात आरती आणि प्रदक्षिणेनंतर बालगोपाळांचा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. नंतर शापोरा नदीत ‘श्रीं’च्या पवित्र स्नानाने व नारळ सोडल्यानंतर सप्ताहाची सांगता होते.
मंदिराचा जीर्णोद्धार
ब्राह्मण देवस्थानचे मूळ मंदिर पोर्तुगीजकालीन होते. त्याचे बांधकाम मातीपासून करण्यात आले होते, जे कालांतराने कमकुवत झाले होते. सन २०१० साली ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा ठराव घेतला. २०१४ साली नवीन मंदिराचा विधीवत सोहळा झाला. या मंदिरात देवतांची आणि योद्धांची थ्रीडी चित्रे बसविण्यात आली आहेत.
सप्ताहात व्यवस्थापन आणि शाळेचा सहभाग
गोव्यात किंवा आसपासही अशी सुसंगठित व पारंपरिक पद्धतीने चालणारी सप्ताह व्यवस्था क्वचितच आढळते. विश्वस्त समिती, मानकरी, सेवेकरी आणि ग्रामस्थांच्या समन्वयामुळे ही परंपरा आजही तेजाळत आहे. या पवित्र सप्ताहात गावातील कीर्ती विद्यालय ही शाळा दरवर्षी सहभाग घेते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली भजन सेवा हे केवळ सादरीकरण नसून, त्यातून त्यांना परंपरेची जाणीव आणि आध्यात्मिक मूल्यांची शिकवण मिळते. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) नुसार संस्कृती आणि मूल्यनिष्ठ शिक्षणाचे सजीव उदाहरण आहे.
शेवटच्या दिवशी कुटुंबमीलनाचा सोहळा
शेवटचा दिवस हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो कुटुंबमीलनाचा क्षण असतो. गावातील व गावाबाहेर राहणारे सर्व नातेवाईक यावेळी हजेरी लावतात आणि आपल्या मूळ गावाशी जुळलेली नाळ अनुभवतात. परंपरा जिवंत ठेवण्यासाठी जी श्रद्धा लागते, ती या सप्ताहात प्रत्येक पावलोपावली जाणवते.