कुडचडे लैंग‌िक अत्याचारप्रकरण;पीडितांनी तक्रार देण्यास पुढे यावे : पोलीस अधीक्षक देसाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
44 mins ago
कुडचडे लैंग‌िक अत्याचारप्रकरण;पीडितांनी  तक्रार देण्यास पुढे यावे : पोलीस अधीक्षक देसाई

पणजी : कुडचडेतील (Curchorem) कथित लैंग‌िक अत्याचारप्रकरणात (Sex scandel) नवीनवी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आणखी कुणी पीडीत असल्यास त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे. तकारदारांची माहिती गुप्त ठेवून व पूर्ण संरक्षण देऊन याप्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक (Superitendent of Police, South Goa)  संतोष देसाई (Santosh Desai)  यांनी सांगितले. 

विरोधी राजकीय पक्षांच्या दबावामुळे काल लैंगिक अत्याचारप्रकरणात ‘पोक्सो’ आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोहम नाईक याला चार दिवसांची पोलीस कोठडी घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांना पत्रकारांनी विचारले असता; त्यांनी वरील माहिती दिली. याप्रकरणी तक्रार देण्यात आलेल्या पीडिता व इतरांच्या जबान्या घेणे सुरू आहे. पीडितांच्या वयाचीही पडताळणी केली जाणार आहे. एकूण याप्रकरणी सखोल तपास केला जाणार आहे. तपासात जशी नवी माहिती पुढे येणार त्यावरून गरज पडल्यास याप्रकणांत आणखी कलमे समाविष्ट केली जाणार किंवा नवा एफआयआरही नोंदवणार असल्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले. 

याप्रकरणी आणखी कुणी पीडीत असल्यास त्यांनी न घाबरता तक्रार नोंदवण्यास पुढे यावे; त्यांची माहिती गुप्त ठेवून पू्र्ण संरक्षण दिले जाणार. याप्रकरणी सखोल तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक देसाई यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. 

दरम्यान, याप्रकरणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुली या अल्पवयीन असून, एकूण याप्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे. एकूण प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिसांनी पुरावे नसल्याचे कारण पुढे करीत व तक्रार देण्यासही कुणी आला नसल्याचे सांगत गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती.

मात्र, त्यानंतर कुडचडेतील स्थानिक व काही नगरसेवकांनी एकत्र येऊन कुडचडे पोलीस स्थानकावर मोर्चा आणून याप्रकरणी ४८ तासांच्या आत गुन्हा नोंदवून गजाआड न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सोहम नाईक याला अटक केली.