
नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले असून, त्याच्याविरोधात एकूण ६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने दाखल झालेल्या तक्रारींमध्ये विद्यार्थिनींचाही समावेश असल्याने प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
पोलिस (Police) तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, धार्मिक विधी, लग्न जुळवून देणे आणि भविष्य सांगणे अशा बहाण्यांखाली महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप पुन्हा अधोरेखित झाले आहेत. तसेच, विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नव्या तक्रारींमुळे संशयिताच्या गुन्ह्यांची व्याप्ती अधिकच वाढत असून; पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
आज दुपारी न्यायालयात नेणार
दरम्यान, अशोक खरातच्या पोलीस कोठडीची (Police custody) मुदत आज संपत आहे. त्याला दुपारी २ वाजता नाशिक सत्र न्यायालयात (Session court) हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात पोलिसांकडून पुढील कोठडी वाढीसाठी काय युक्तिवाद केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांवर संशय
या प्रकरणात मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑडिट अहवालानुसार, २०२० ते २०२२ दरम्यान संस्थानचे उत्पन्न सुमारे ४.९० लाख रुपये होते, तर १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूट नोंदवली गेली होती.
२०२४ नंतर उत्पन्नात वाढ
मात्र, २०२४ नंतर संस्थानच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ झाली असून, तब्बल ७६.९१ लाख रुपयांचे उत्पन्न नोंदवले गेले आहे. खर्च वजा जाता सुमारे ७०.६६ लाख रुपये शिल्लक राहिल्याचे समोर आले आहे. याशिवाय, संस्थेची मालमत्ता २०२२ मधील ९६ लाखांवरून २०२५ पर्यंत १.८१ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे दिसते. बँकेत २३.२५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी असल्याची माहितीही समोर आली आहे.
या अचानक वाढलेल्या उत्पन्नामागील स्रोत, देणग्यांचे स्वरूप आणि संबंधित व्यवहारांचा तपास सध्या केंद्रस्थानी असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसआयटी प्रमुखांचे नागरिकांना आवाहन
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती असलेल्या नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन एसआयटी प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.