निवडणूक आयोग म्हणतोय ‘लिपिकीय चूक’

तिरुवनंतपुरम : निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर केरळमध्ये (Kerala) मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. देशातील राजकीय पक्षांना पाठविण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या (Election commission) एका पत्रावर चुकून भाजप केरळ युनिटचा (BJP Kerala Unit) ) शिक्का आढळल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यावर भारतीय निवडणूक आयोगाने (Indian Election commission) ती केवळ ‘लिपिकीय (clerical) चूक” असल्याचे स्पष्ट करीत त्वरीत दुरुस्त केल्याचे म्हटले आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर माकप (CPI(M)) आणि काँग्रेसने (Congress) यावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. माकपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर संबंधित पत्राची प्रत शेअर करत, “भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यातील भेद संपले का?” असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणावर निवडणूक आयोगाने तात्काळ स्पष्टीकरण देत हा प्रकार “फक्त लिपिकीय (clerical) चूक” असल्याचे सांगितले. आयोगाने ही चूक त्वरित दुरुस्त करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.
केरळच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयानेही अधिकृत निवेदन जारी करत नागरिक आणि माध्यमांना आवाहन केले की, “या लिपिकीय चुकीच्या आधारे दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये आणि संयम बाळगावा.”
तथापि, निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.