फोंडा पोटनिवडणुकीत डॉ. केतन भाटीकर सर्वात श्रीमंत उमेदवार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
29 mins ago
फोंडा पोटनिवडणुकीत डॉ. केतन भाटीकर सर्वात श्रीमंत उमेदवार

पणजी : फोंडा (Ponda) विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (By-election) अर्ज भरण्याची अंतिम मुदत काल सोमवारी संपली. या जागेसाठी डॉ.केतन भाटीकर, रितेश नाईक आणि गीतेश नाईक यांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार डॉ. केतन भाटीकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

त्यांच्याकडे सुमारे ४.८८ कोटींची स्थावर आणि जंगम स्वरूपाची मालमत्ता आहे. रितेश नाईक यांनी १.५५ कोटी रुपये तर गीतेश नाईक यांनी सुमारे ७२ लाख रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञा पत्रात जाहीर केली आहे.

प्रतिज्ञा पत्रानुसार काँग्रेस उमेदवार डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar)  यांनी १.०८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये दहा बँक खात्यातील ठेवी, गुंतवणुकी, वाहने, दोन चारचाकी व एक दुचाकी वाहन, सोन्याचे चार पद्धतीचे दागिने आदींचा समावेश आहे. तर स्थावर मालमत्तेमध्ये बिगर कृषी जमीन, व्यावसायिक गाळे, फ्लॅट आदींचा समावेश आहे. या सर्वांची किंमत ३.८० कोटी रुपये आहे. डॉ. भाटीकर १.२९ कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यांनी २०२४- २५ मध्ये आयकर भरताना वार्षिक उत्पन्न १३.२५ लाख असल्याचे नमूद केले आहे.

भाजपचे उमेदवार रितेश नाईक (Ritesh Naik)  यांनी १.५५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम ५२ हजार रुपये, बँक ठेवी ७ लाख रुपये, म्युच्युअल फंडातील ७ लाख रुपये, पोस्ट आणि तत्सम गुंतवणूक १.८८ लाख रुपये, तर दागिने १.३८ कोटी रूपयांचे असल्याचे नमून केले आहे. त्यांच्या नावे स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे. त्यांनी २०२४- २५ मध्ये आयकर भरताना वार्षिक उत्पन्न १५.४६ लाख असल्याचे नमूद केले आहे.

आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक (Geetesh Naik)  यांनी सुमारे ५३.९७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या मालमत्तेचा देखील समावेश आहे. यात तीन बँक खात्यातील ठेवी, रोख रक्कम , कंपनीतीळ शेअर, दोन चारचाकी व एक दुचाकी, १०६ ग्रॅम सोने यांचा समावेश आहे. तर स्थावर मालमत्तेत प्लॉटचा समावेश आहे. 

गीतेश नाईक सुमारे १८.३६ लाख रुपये देणे बाकी आहे. २०२४- २५ मध्ये आयकर भरताना वार्षिक उत्पन्न ६.९७ लाख असल्याचे नमूद केले आहे.