
पणजी : ९ एप्रिल रोजी होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात गोवास्थित (Goa) मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल झालेल्या दोन याचिकांवरील (Petition) पुढील सुनावणी न्यायालयाने सोमवारी ३० मार्च रोजी ठेवली आहे. या दोन्ही याचिका मंगळवारी सुनावणीला आल्या असता; भारतीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी वेळ मागून घेतला. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली.
विद्यमान विधानसभेची (Assembly) पाच वर्षांची मुदत संपण्यास एक वर्षाहून कमी कार्यकाळ राहिला आहे. एक वर्षाहून कमी कार्यकाळ असल्यास पोट निवडणूक घेता येत नसल्याचा मुद्दा याचिकादारांतर्फे न्यायालयात उपस्थित करण्यात आला. त्यावर भारतीय निवडणूक आयोगाच्या वकीलांनी युक्तीवाद करण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणी प्रितम हरमलकर आणि अंकिता कामत या दोघांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत.
न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
दरम्यान, फोंडा (Ponda) विधानसभा (Assembly) पोटनिवडणूक (By-election) ९ एप्रिल रोजी होणार आहे. तिघांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला ही सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या दोन याचिकांवरील न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.