
बेंगळुरू : पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करताना बिअरची बाटली (Beer Bottle) हातात घेऊन हेल्मेट (Helmet) न घालता एका दुचाकीवर तिघेजण जाऊन वाहतूक नियमभंग करणे तिघा डॉक्टरांना (Doctor) पडले महागात. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होताच बेंगळुरू पोलिसांनी (Bangluru Police) तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
अस्थिरोग शास्त्रात पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एका महिला डॉक्टरसहीत तिघे डॉक्टर हातात बिअर घेऊन एका दुचाकीवर विनाहेल्मेट रस्त्याने जात होते. कुणीतरी त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला.
हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी तिघाही डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. रविवारी रात्री १० वाजता बेंगळुरूतील बीटीएम ते जयदेवा जंक्शन यामध्ये हा प्रकार घडला. या तिघाही डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नेटीझन्स ही त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत डॉक्टरांना लक्ष्य करीत आहेत.