महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप यांची मागणी

पणजी: कुडचडे (Curchorem) येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार (Sex scandal) प्रकरणातील संशयिताची पार्श्वभूमी प्रभावशाली आहे. त्यासाठी याप्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन विशेष तपास पथकामार्फत याची चौकशी व्हावी. अशी मागणी महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप यांनी केली.
पणजी (Panjim) येथे गोवा राज्य महिला आयोगाला (Goa State Commission for Women) निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमध्यमांकडे बोलताना, गोवा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी या प्रकरणाच्या गांभीर्यावर भर दिला. या प्रकरणांत २० वर्षांच्या सोहम नाईक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ प्रसारीत केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादीत नसून, त्यात आणखी काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता डॉ. खलप यांनी व्यक्त केली.
गोव्यातील महिलांच्या तक्रार निवारण यंत्रणेच्या सध्याच्या परिस्थितीवर डॉ. खलप यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. महिला आयोगाची मुदत याच महिन्याच्या सुरवातीला संपली. त्यामुळे अशा गंभीर प्रसंगी आयोग बिनकामी झाला असल्याचे त्या म्हणाल्या. अशा गंभीर विषयांवर उपाय करण्यासाठी सध्या कुठलाही सक्रीय मंच उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले.
आयोगाचे काम लवकरच सुरू व्हावे आणि या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन खास तपास आणि पिडित आधार समिती स्थापन करावी, अशी मागणी महिला कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. तसेच पोलिसांकडे समन्वय साधून याप्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.