इराणच्या नव्या सुरक्षा प्रमुखाची नियुक्ती; अमेरिका-इराण तणाव अधिक तीव्र

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
इराणच्या नव्या सुरक्षा प्रमुखाची नियुक्ती; अमेरिका-इराण तणाव अधिक तीव्र

तेहरान/तेल अवीव/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (Supreme National Security Council) सचिवपदी मोहम्मद बाघेर झोलघादर यांची नियुक्ती केली आहे. अली लारीजानी यांच्या हत्येनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

इस्त्रायलची भीषण हानी

दरम्यान, इराणकडून (Iran) डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलची (Israel) राजधानी तेल अवीवमध्ये अनेक ठिकाणी भीषण हानी केली आहे. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारतींचे नुकसान झाले असून; किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराण, अमेरिकेचे परस्पर दावे

अमेरिकेचे (USA) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापक करारासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. “यावेळी इराण गंभीर आहे. ते शांतता प्रस्थापित करू इच्छितात,” असे ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, तेहरानने या दाव्याचे खंडन करत अशा चर्चांना “फेक न्यूज” संबोधले आहे. इराणच्या संसदेच्या  सभापतींनी हे दावे आर्थिक व तेल बाजारावर परिणाम घडवण्यासाठी केल्याचा आरोप केला आहे.

इराणकडून बहरेन, सौदी अरेबिया, कुवेतवर क्षेपणास्त्रे

याचवेळी, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणमधील लक्ष्यांवर हल्ले सुरूच असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, इराणकडून बहरेन, सौदी अरेबिया आणि कुवेतसह आखाती देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरूच असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

या वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून; जागतिक स्तरावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. ताज्या घडामोडी आणि मृत्यूंच्या आकडेवारीसाठी अधिकृत स्रोतांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा