अमेरिका-इराणचे चर्चेबाबत परस्परविरोधी दावे; कच्च्या तेलाची किंमत पुन्हा १०० डॉलर पार

तणावाचा तेल बाजारावर परिणाम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
46 mins ago
अमेरिका-इराणचे चर्चेबाबत परस्परविरोधी दावे; कच्च्या तेलाची किंमत पुन्हा १०० डॉलर पार

वॉशिंग्टन/तेहरान/आशिया : अमेरिका (USA) आणि इराण (Iran) यांच्यातील संभाव्य चर्चेबाबत परस्परविरोधी दावे समोर आल्यानंतर जागतिक तेल बाजारात पुन्हा मोठी अस्थिरता दिसून आली आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत पुन्हा १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेली आहे.

ब्रेंट क्रूड १०३.९४ डॉलर प्र‌त‌ि बॅलर

मंगळवारी आशियाई बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत ४ टक्क्यांनी वाढून १०३.९४  डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली, तर नायमेक्स लाईट स्वीट क्रूड ४.१ टक्क्यांनी वाढून ९१.७५ डॉलरवर गेली. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी इराणवरील संभाव्य हल्ले स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर तेलाच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.

इराणचा चर्चेचा इन्कार

ट्रम्प यांनी वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला होता. मात्र, इराणने हे दावे फेटाळून लावत अशा कोणत्याही चर्चेचा इन्कार केला आणि बाजारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

ब्रेंट क्रूडची किंमत ११३ डॉलरपर्यंत 

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz ) या महत्त्वाच्या जलमार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू न झाल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही प्रादेशिक पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकी दिली होती. या तणावामुळे ब्रेंट क्रूडची किंमत ११३ डॉलरपर्यंत पोहोचली होती.

ऊर्जा बाजारात चढ-उतार 

तथापि, हल्ले टाळण्याच्या घोषणेनंतर तेलाच्या किमतीत घसरण झाली आणि शेअर बाजारातही काहीसा दिलासा मिळाला. तरीही २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी चढ-उतार कायम आहे.

शेआर  बाजार काहीसे स्थिर

आशियाई शेअर बाजार मंगळवारी काहीसे स्थिर दिसले. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.८ टक्क्यांनी वाढला, तर हाँगकाँगचा हँगसेंग १.६  टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी २.२ टक्क्यांनी वधारला.

इंधन दरात वाढ

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz)  मार्गावरून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू वाहतूक होते. मात्र, युद्धामुळे हा मार्ग मोठ्या प्रमाणात अडथळ्यात आला असून; इंधन दरात मोठी वाढ झाली आहे.

ऊर्जा तुटवड्याचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना

जागतिक स्तरावर अनेक देशांनी ऊर्जा तुटवड्याचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेने रशिया आणि इराणमधून समुद्रात असलेल्या तेलावर तात्पुरती सवलत दिली आहे. तर चीनने वाढत्या इंधन दराचा भार कमी करण्यासाठी नियोजित दरवाढ मागे घेतली आहे.

हेही वाचा