डिचोली : यंदा होणार मये येथील ‘माल्याची जत्रा’

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ग्रामस्थांचे भाविकांना आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th March, 11:08 pm
डिचोली : यंदा होणार मये येथील ‘माल्याची जत्रा’

डिचोली : मुळगाव येथील ग्रामदेवता श्री केळबाई देवीची जत्रा उत्साहात पार पडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी मये गावातील पारंपरिक ‘माल्याची जत्रा’ साजरी होणार आहे, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत केळबाई देवस्थानातील अंतर्गत वादांमुळे जत्रेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही गैरसमज व अफवा पसरत असल्या, तरी भाविकांनी त्याकडे दुर्लक्ष करून मोठ्या संख्येने जत्रेला उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

परंपरेनुसार मुळगावातील देवी केळबाईची पेठ मये गावातील ‘वडणे’ या ठिकाणी पोहोचल्यानंतर मये येथील केळबाई मंदिरातून सजवलेली पेठ आणि मुळगावच्या देवी केळबाईची पेठ पहाटे चव्हाट्यावर आणली जाते. यंदा मयेची पेठ असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी चव्हाट्यावर आणण्यात आली. त्यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

भाविकांकडून पेठेचे दर्शन...
चव्हाट्यावर पेठ विराजमान झाल्यानंतर भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले. यावेळी गावस, कार्बोटकर, नाईक व च्यारी समाजातील ग्रामस्थांनी माध्यमांशी संवाद साधला. हरिश्चंद्र च्यारी यांनी सांगितले की, माल्याची जत्रा ही परंपरेप्रमाणेच होणार असून भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता उत्सवात सहभागी व्हावे. मये गावात होणाऱ्या या जत्रेकडे संपूर्ण परिसरातील भाविकांचे लक्ष लागले असून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडणार असल्याचा विश्वास दादू नाईक यांनीही व्यक्त केला.

हेही वाचा