बांबोळी परिसरात महिलेवर दोघा युवकांकडून लैंगिक अत्याचार

१२ तासांत दोघांना अटक : पाच दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
बांबोळी परिसरात महिलेवर दोघा युवकांकडून लैंगिक अत्याचार

पणजी : बांबोळी परिसरात एका महिलेवर दोघा युवकांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आगशी पोलिसांनी यूपीआय व्यवहाराच्या आधारे अवघ्या १२ तासांत रोवन आब्रान्चेस (२१, वेर्णा) आणि मेक्वीन आद्राद (२५, नुवे) या दोघा संशयितांना अटक केली.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ मार्च रोजी पीडित महिलेने तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, १७ मार्च रोजी ती बांबोळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. सायंकाळी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास दोघा अज्ञात युवकांनी तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांनी तिला मद्यपान करण्यास प्रवृत्त केले.

मद्याच्या नशेत असताना त्या दोघांनी तिला आगशी येथील नवीन जुवारी पुलाखाली, नदीकाठच्या निर्जन भागात नेले. तेथे तिला मद्य दिल्यानंतर ती शुद्धीवर नसताना तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक रक्षा नाईक यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडितेने आरोपींनी दारूसाठी यूपीआयद्वारे पैसे दिल्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित दुकानाची तपासणी केली असता यूपीआय व्यवहाराची माहिती हाती लागली. त्या आधारे रोवन आब्रान्चेस याची ओळख पटली. पुढील चौकशीत त्याच्याकडून मेक्वीन आद्राद याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.

अटक केलेल्या दोघांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यूपीआयद्वारे सापडले संशयित

तपासादरम्यान पीडितेने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. आरोपींनी दारू खरेदीसाठी यूपीआयद्वारे पैसे दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या धाग्याचा पाठपुरावा करत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले तसेच संबंधित दुकानात जाऊन चौकशी केली. या तपासातून संशयित यूपीआय व्यवहाराची ठोस माहिती हाती लागली. यानंतर दोघांना अटक करण्यात आली.