कोलवा येथील पत्नीची हत्या प्रकरण

मडगाव : कोलवा येथील ‘कोर्टयार्ड बाय मॅरियट’ या हॉटेलचा मॅनेजर गौरव कटियार याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली असून खटला सुरू आहे. या प्रकरणी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची संशयिताची मागणी फेटाळून लावली.
जानेवारी २०२४ मध्ये संशयित गौरव कटियार याने २७ वर्षीय पत्नी दीक्षा गंगवार हिची काणकोण येथील काब द रामा येथील समुद्रकिनार्यावर बुडवून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. दीक्षाला गौरवच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल संशय असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून कटियारने तिला समुद्रकिनार्यावर नेऊन तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीवेळी गौरव कटियार याने न्यायालयात अर्ज दाखल करून या खटल्याचे कामकाज व्हिडिओ रेकॉर्डिंग सुविधेद्वारे होण्याची मागणी केली. यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या १ जुलै २०२५ च्या नियमावलीचा आधार घेतला होता. सरकारी वकिलांनीही या अर्जाला विरोध करताना संशयित केवळ खटल्याला विलंब करण्यासाठी असे अर्ज करत आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वीच साक्षीदारांची तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
न्यायाधीश शेरीन पॉल यांनी प्रत्येक खटल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अनिवार्य नाही, खटल्याचे कामकाज बरेच पुढे सरकले असून, आतापर्यंतच्या प्रक्रियेवर संशयिताने कोणतीही हरकत घेतली नव्हती, सध्या न्यायालयात अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगसाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध नाही आणि केवळ सुविधेअभावी खटल्याचे कामकाज थांबवता येणार नाही, असे आदेशात नमूद करत हा अर्ज फेटाळून लावला.