११ नगरपालिकांमधील प्रभाग संख्या निश्चित

पणजी : मतदार पडताळणी मोहीम (एसआयआर) पूर्ण झाल्यानंतर राज्यातील नगरपालिकांमधील प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. मतदारांच्या संख्येत घट झाल्यामुळे काही ठिकाणी प्रभागसंख्येत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार मुरगाव पालिकेचे प्रभाग २५ वरून २१, तर मडगाव पालिकेचे प्रभाग २५ वरून २४ करण्यात आले आहेत.
एसआयआर मोहिमेद्वारे मृत किंवा अस्तित्वात नसलेल्या मतदारांची नावे वगळल्यामुळे सर्व नगरपालिकांमधील मतदारसंख्या कमी झाली आहे. इतर नगरपालिकांमधील प्रभागांची संख्या पूर्वीप्रमाणेच राहणार असली, तरी त्यातील मतदारांच्या संख्येत मात्र घट दिसून येणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांची संख्या कमी झाल्यामुळे आणि प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे प्रत्येक नगरपालिकेतील जुनी राजकीय गणिते बदलणार असून, उमेदवारांना आता नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
११ नगरपालिकांच्या निवडणुका मेमध्ये
डिचोली, पेडणे, वाळपई, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, काणकोण, म्हापसा, मुरगाव, मडगाव, सांगे आणि केपे या ११ नगरपालिकांच्या निवडणुका मे महिन्यात होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग फेररचना प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच आरक्षणाची अधिसूचना जारी होणार आहे.
प्रभागसंख्या जाहीर
राज्य निवडणूक आयुक्त मिनीन डिसोझा यांनी ११ नगरपालिकांच्या प्रभागसंख्येचा अंतिम आकडा जाहीर केला. त्यानुसार डिचोली १४, पेडणे १०, वाळपई १०, कुंकळ्ळी १४, कुडचडे-काकोडा १५, काणकोण १२, म्हापसा २०, सांगे १०, केपे १३, मुरगाव २१ आणि मडगाव २४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.