कुडचडे लैंगिक अत्याचार; ४ पीडित युवती तक्रारीसाठी पुढे

पणजी : कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित सोहम नाईक (२०, काकोडा) याने केवळ एक-दोन नव्हे, तर सुमारे २० तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी चार पीडित तरुणी आता रीतसर तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत.तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या चार मुलींची जबानी नोंदवण्यासाठी पोलीस एका बिगर सरकारी संस्थेची (एनजीओ) मदत घेणार आहेत. गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू होऊन नवीन गुन्हे दाखल केले जातील. दरम्यान, बुधवारी संशयित सोहम नाईक याची बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
हे प्रकरण २२ मार्च रोजी उघडकीस आले होते. सुरुवातीला एका तक्रारीवरून सोहमला अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर इतर दोन मुलींनी समोर येत तक्रार दिल्याने त्याच्यावर पॉक्सो आणि गोवा बाल कायद्यांतर्गत अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आता पीडितांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक परेश नाईक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न
तपासादरम्यान असे दिसून आले आहे की, अटक होण्यापूर्वी संशयिताने आपल्या मोबाईलमधील गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ डिलिट केले होते.
डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी जप्त केलेला मोबाईल पुढील दोन दिवसांत न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.