काँग्रेसची मत्स्योद्योग मंत्र्यांकडे मागणी

पणजी : मत्स्योद्योग खात्यातील दोन सर्वेक्षकांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी आणि पदोन्नती मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला आहे. बुधवारी साविओ डिसिल्वा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याप्रकरणी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी वीरेंद्र शिरोडकर, अर्चित नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भेटीनंतर डिसिल्वा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संबंधित खात्यातील दोन कर्मचाऱ्यांनी झारखंड येथील एका शिक्षण संस्थेची प्रमाणपत्रे जोडून नोकरी मिळवली होती. ही शिक्षण संस्था अस्तित्वात नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. याबाबतच्या अन्य एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने देखील निकाल दिला आहे. याबाबत काँग्रेसने जानेवारीत तक्रार करूनही दक्षता खात्याला मत्स्योद्योग खात्याकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही.
राज्यात बेरोजगारी वाढत आहे. पदवीधर युवक नोकऱ्या नसल्याने घरी बसून आहेत. अशावेळी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी डिसिल्वा यांनी केली.
मंत्र्यांचे आश्वासन
मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काँग्रेस शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असून, या प्रकरणाची शहानिशा करून पुढील ८ दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.