ओव्हरटेकच्या रागातून कारचालकावर हल्ला; युवक अटकेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 mins ago
ओव्हरटेकच्या रागातून कारचालकावर हल्ला; युवक अटकेत

मडगाव : नावेली मंडोप परिसरात बुधवारी सायंकाळी अँथनी रिबेलो (२०, रा. चिंचणी) याने दुचाकीने पाठलाग करत कारला रोखले. त्यानंतर चाकू दाखवून टॅक्सीचालकाला धमकावत गाडीचेही नुकसान केले. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

नावेली येथील मंडोप परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत घबराट पसरली. इनोव्हा या टुरिस्ट टॅक्सीने दुचाकीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून संशयित अँथनी रिबेलो याने गाडीचा पाठलाग करत हा प्रकार केला. याप्रकरणी रॉय मास्कारेन्हस (४०, रा. असोल्डा, केपे) यांनी मडगाव पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, चांदर येथून मोड्डी नावेलीच्या दिशेने येत असताना गुडी परिसरात संशयित अँथनी रिबेलो हा रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत होता. त्याला हॉर्न मारुन त्याला ओव्हरटेक केले. याच रागातून अँथनी या युवकाने गाडीचा पाठलाग करत मंडोप नावेली येथे गाडीसमोर दुचाकी घालून गाडी अडवली. त्यानंतर दुचाकीच्या डिकीतून चाकू काढून गाडीच्या काचा खाली करण्यास सांगितले व शिवीगाळही केली. यानंतर गाडीचे आरसे फोडून गाडीच्या बॉनेटवर चढून पुढील काचही फोडली. स्थानिक गोळा होऊ लागल्यानंतर त्याने चाकू पुन्हा दुचाकीच्या डिकीत टाकला. त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित अँथनी याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.