म्हापशातील उत्तर शैक्षणिक विभागातील प्रकार : वर्षभरापासून नळाला पाणी नाही

म्हापसा : शिक्षण खात्याच्या म्हापसा येथील उत्तर शैक्षणिक विभागात इमारतीचा पाणी पुरवठा मागील वर्षभरापासून खंडित आहे. परिणामी कार्यालयाच्या लेखा विभागाने टँकरद्वारे पाण्याची सोय केली असून टँकरभर पाणी पुरत नसल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या इमारतीला जोडणाऱ्या जलवाहिनीमध्ये बिघाड झाला असून गेले वर्षभर नळाला पाणी येणे बंद झाले आहे. मुख्य जलवाहिनीपासून इमारतीपर्यंत नवीन जलवाहिनी जोडणी देण्याच्या कामाचे अंदाजपत्रक शिक्षण खात्याने मंजूर केले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याकामासाठी लागणारी रस्ता कापणी एनओसी मिळून सहा महिने उलटले आहेत. तरीही हे काम हाती घेण्याच्या संदर्भात पेयजल पुरवठा खात्याला वर्क ऑर्डर अद्याप कार्यालयाकडून देण्यात आली नाही.
नळाचा पाणी पुरवठा खंडित झाल्याने विभागाच्या लेखा कार्यालयाने टँकरच्या माध्यमातून इमारतीमध्ये पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्यक्षात म्हापसा शहरात टँकरचा दर ५०० ते ६०० रूपये आहे. दरदिवसा बाराशे रुपये खर्चून एक टँकरभर पाणी या इमारतीच्या टाकीमध्ये टाकले जाते. टँकरवाल्याकडून सकाळ किंवा दुपारी हा पाणी पुरवठा होत असून या अनियमितपणाचा त्रास विद्यार्थी वर्ग आणि कर्मचाऱ्यांना होतो. स्वच्छतागृहामध्ये पुरेसे पाणी मिळत नाही.
उत्तर शैक्षणिक विभाग इमारतीमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा तसेच शिक्षण खात्याचे उपसंचालक, भागशिक्षणाधिकारी कार्यालय सुरू आहे. शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी तर कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक मिळून इमारतीमध्ये एकूण अडीचशे लोक आहेत. एक टँकरभर पाणी अडीचशे लोकांना पुरणारे नाही. त्यामुळे पाण्याअभावी इमारतीमधील शाळा आणि कार्यालयांतील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गलिच्छ वातावरणाचा सामाना ही इमारत गेल्या वर्षभरापासून करत आहे.
एखाद्या विभागाचे कार्यालयीन कामकाज मुख्य कारकूनाकडून हाताळले जाते. परंतु टँकरद्वारे पाण्याची व्यवस्थेची जबाबदारी ही या विभागाच्या लेखा विभागाने परस्पररित्या स्वत:च्या हाती घेतली आहे. त्यामुळे हा जलवाहिनीच्या दुरुस्तीचा प्रश्न खोळंबला आहे. याशिवाय शिक्षण खात्यासमोर आर्थिक बाबीचा प्रश्नही निर्माण झाला असून विद्यार्थी व कर्मचारी वर्ग सुरळीत पाणी पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहे.
इमारतीला जोडणाऱ्या नवीन जलवाहिनीचे अंदाजपत्रक तयार आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रस्ता कापणीसाठी दाखला मिळाला आहे. हे जलवाहिनीचे काम पेयजल खात्यामार्फत लवकरच हाती घेतले जाईल, असे उपसंचालक अंजली मळीक यांनी सांगितले.