परदेशातील गोमंतकीयांना चाखता येणार मानकुरादची चव!

मोपा विमानतळावर लवकरच ‘पॅक हाऊस’ : कृषी संचालक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 mins ago
परदेशातील गोमंतकीयांना चाखता येणार मानकुरादची चव!

पणजी : परदेशात राहणाऱ्या गोमंतकीयांना लवकरच मानकुराद आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. युरोप आणि आखाती देशांकडे गोव्याचा शेतमाल निर्यात करण्यासाठी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक ‘पॅक हाऊस’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या एप्रिल महिन्यात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मोपा विमानतळावर पॅक हाऊस उभारण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने गोवा अॅग्रिकल्चरल अँड लाईव्हस्टॉक प्रोड्युसिंग बोर्ड आणि जीएमआर यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे.
हा प्रकल्प शेतकी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपेडा) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उभारला जाणार आहे. पॅक हाऊस उभारण्यासाठी ९० टक्के अनुदान उपलब्ध होणार असल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात कोणत्याही विमानतळाच्या ३०० मीटर परिसरात पॅक हाऊस सुविधा उपलब्ध नाही, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.
शेतकऱ्यांना मोठी संधी
या पॅक हाऊसमुळे गोव्याच्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट परदेशात निर्यात करण्याची संधी मिळणार आहे. मानकुराद आंब्यासह भेंडी, हिरव्या भाज्या तसेच हवामानानुसार घेतली जाणारी विविध पिके मोठ्या प्रमाणात निर्यात करता येणार आहेत. तसेच लोणचे, फेणी यांसारख्या प्रक्रिया केलेल्या उत्पादनांनाही चांगला बाजारभाव मिळू शकतो. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन संचालक फळदेसाई यांनी केले आहे.
पॅक हाऊस’साठी मुख्यमंत्र्यांचे एपीडाला पत्र
‘पॅक हाऊस’साठी येत्या एप्रिल महिन्यात एपीडाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार अाहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एपीडाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले असून, त्यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षात मंजुरी मिळेल, असे आश्वासन दिले आहे. मंजुरी मिळताच पॅक हाऊस उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.      

हेही वाचा