झाडांची पडझड

वाळपई : सत्तरी तालुक्यातील (Sattari Taluka) काही भागात चक्रीवादळाचा (Cyclone) जबर तडाखा बसला. त्यात घरांचे नुकसान झाले तर झाडांची पडझड झाली. सुरंगुली, धारगे, खोतोडा. मलपण भागाला चक्रीवादळाचा फटका बसला. घरांचे छप्पर, पत्रे उडाल्याने व झाडे घरांवर पडल्याने बरेच नुकसान झाले.
अचानक आलेल्या चक्रीवादळाने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात अग्निशमन दलाला माहिती देण्यात आल्यावर चक्रीवादळामुळे पडलेली झाडे व निर्माण झालेले अडथळे दूर करण्याचे काम सुरू केले. अनेक झाडांची पडझड झाल्याने अग्निशमन दलाला एकच धावपळ करावी लागली.
अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) मिळालेल्या माहितीनुसार, सुरंगुली येथे लक्ष्मी गावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने; ३० हजार रुपयांचे नुकसान झाले तर ३५ हजारांची मालमत्ता वाचवण्यात आली.
सुरंगुली येथील निळकंठ गावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ३० हजारांचे नुकसान झाले तर ४० हजारांची मालमत्ता वाचवण्यात आली. धार्गे, साकोर्डे येथे आंब्याचे झाड एकनाथ गावकर यांच्या घरावर पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले तर १ लाखाची मालमत्ता अग्निशमन दलाने वाचवली.
सुरंगुली येथे विजेच्या खांबावर पडलेले फणसाचे झाड अग्निशमन दलाने हटवले. मात्र, यात काही नुकसान झाले नाही. सुरंगुली येथे रस्त्यावर पडलेले फणसाचे झाड हटवून रस्ता मोकळा केला.