आणखी तीन मुलींची जबानी नोंदवणे सुरू; चार एफआयआर

पणजी : कुडचडे (Curchorem) येथील लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेला २० वर्षीय सोहम नाईक (Soham Naik) अल्पवयीन (Minor) असतानाच या प्रकारात गुंतला होता; असे तपासात पुढे आले आहे. सोहम व काही पीडिताही त्यावेळी अल्पवयीन होत्या. एकदम संवेदनशील बनलेल्या या प्रकरणात सध्या नवीनवी माहिती पुढे येत आहे.
याप्रकरणी आणखी तीन मुलींच्या जबान्या नोंदवण्यसााठी तपास अधिकारी प्रयत्नशील आहेत. तक्रार करणाऱ्या पीडितांची संख्या ५ झाली आहे. सोहम नाईक याच्या विरोधात आतापर्यंत ४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
काल संशयित सोहम नाईक याला न्यायालयाकडून आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर क्राईम ब्रॅंच याप्रकरणी सखोल तपास करीत आहे.
पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न
क्राईम ब्रॅंचचे (Crime Branch) दोन वेगवेगळे पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत व जबान्या नोंदवून घेत आहेत. इलेक्ट्रॉनीक पुरावे गोळा करण्यासाठी तपास अधिकारी प्रयत्नशील असून, आणखी काही मुली या सापळ्यात सापडल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
सोहम नाईक याच्यावर अनेक मुलींचे शोषण केल्याचा कथित आरोप आहे. लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ काढून इंटरनेटवरून प्रसारित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याच अनुषंगाने क्राईम ब्रॅंचचा तपास सुरू आहे.
तर आणखी अटक होऊ शकते : डीजीपी
पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता; याप्रकरणी निश्पक्ष तपास केला जात असल्याचे सांगितले. तपासात जशी माहिती पुढे येणार त्यावरून आणखी काहीजणांना अटक होऊ शकते. मात्र तो तपासाचा भाग असून, तपासात आणखी कुणाचा सहभाग असल्यास अटक होऊ शकते; असे डीजीपी आलोक कुमार म्हणाले. याप्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊनच प्रकरण क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्यात आले आहे. त्यातून सखोल तपास करण्याबरोबरच पीडितांची ओळख गुप्त ठेवणे शक्य होणार असल्याचे डीजीपी आलोक कुमार म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोहम नाईक याने आपण काही मुलींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडीओ बनवल्याची माहिती आपल्या मित्रांना दिल्यावर या एकूण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. त्यानंतर कुडचडेतील स्थानिक ग्रामस्थ व काही नगरसेवकांनी याप्रकरणी आवाज करून मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दबाव वाढताच कुडचडे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून सोहम नाईक याला अटक केली. त्यानंतर मंगळवारी प्रकरण पुढील तपासासाठी क्राईम ब्रॅंचकडे देण्यात आले.
मुलींशी मैत्री करून लैंगिक शोषण
वेगवेगळे बहाणे करून मुलींशी जवळीक साधून मैत्री करणे व नंतर त्यांचे लैंगिक शोषण करून व्हिडीओ काढणे ही सोहम नाईक याची कार्यपद्धती असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले.