मच्छीमार, शैक्षणिक संस्थांना निर्बंधातून विशेष सवलत

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंधन विक्रीबाबत काढण्यात आलेल्या यापूर्वीच्या आदेशात अंशत: बदल करून सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये मच्छीमारी व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांना इंधन विक्रीच्या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी २७ मार्च रोजी इंधन विक्री संदर्भात आदेश जारी केला होता. या आदेशात आता अंशत: बदल करून नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमांनुसार, काही विशिष्ट क्षेत्रांना पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात निर्बंधातून सवलत दिली आहे. जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, मासेमारीशी संबंधित व्यवसाय, मच्छीमार बोटी आणि इतर जलवाहतूक करणाऱ्या नौकांसह शैक्षणिक संस्थांमधील 'डिझेल जनरेटर' संचांसाठी इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तसेच, इतर अत्यावश्यक सेवांसाठी सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीने आवश्यक इंधन पुरवठा केला जाईल. या सवलतीचा लाभ घेताना योग्य पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त मूळ आदेशातील इतर सर्व अटी कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा सुधारित आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे.