गोव्यात इंधन पुरवठा सुरळीत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17 mins ago
गोव्यात इंधन पुरवठा सुरळीत

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात निर्माण झालेला इंधन तुटवड्याचा संभ्रम आता दूर झाला असून परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने राज्यातील पेट्रोल पंपांवर काही दिवसांपासून दिसणाऱ्या लांबच लांब रांगा पूर्णपणे अदृश्य झाल्या होत्या. पणजीसारख्या मुख्य शहरांमधील पंपांवर काही प्रमाणात गर्दी असली, तरी इंधन विक्रीची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

गोवा पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गुरुवारी मुरगाव बंदरात 'एम. व्ही. सान्मार सितार' ही इंधनाची नौका दाखल झाली. यामध्ये १८ हजार मेट्रिक टन डिझेल आणि ८ हजार मेट्रिक टन पेट्रोलचा साठा आहे. हा साठा गोव्याच्या सरासरी गरजेचा विचार करता पुढील १५ दिवस सहज पुरू शकतो, अशी खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

इंधनाचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीपोटी गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारंवार आवाहन करूनही 'पॅनिक बाइंग'मुळे अनेक पंपांवरील साठा तात्पुरता संपला होता. मात्र, नवीन साठा उपलब्ध झाल्यानंतर आता पुरवठा साखळी पुन्हा रुळावर आली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, इंधनाचा साठा पुरेसा असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अनावश्यक साठवणूक करू नये. सद्यस्थितीत राज्याच्या सर्व भागांत पेट्रोल आणि डिझेल सहज उपलब्ध असून, इंधन टँकर्सचे परिचालनही नियमितपणे सुरू आहे.

हेही वाचा