महापौर पदासाठी रोहित तर उपमहापौर पदासाठी आगशीकर यांचे अर्ज

पणजी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election) मी उमेदवारी दाखल करणार असल्याने महापौर म्हणून काम करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. असे असले तरी आम्ही पणजीमध्ये (Panjim) विकास कामे करत राहणार आहोत. महापालिका निवडणूक काळात लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.
शुक्रवारी त्यांनी महापालिकेच्या (Muncipal Corporation) महापौर पदासाठी तर वसंत आगशीकर यांनी उपमहापौर पदासाठी आपले अर्ज सादर केले. अर्ज दाखल केल्यानंतर रोहित यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी विधानसभेसाठी प्रयत्न करणार असलो तरी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील.
आम्ही या आधीच लोकांची कामे सुरू केली आहेत. महापौर म्हणून मला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी मिळेल. यामध्ये जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकशाहीत कुणीही कुणालाही मत देऊ शकतो. एखाद्या प्रभागात आमचा उमेदवार निवडून आला नसला तरी देखील आम्ही कोणताही दूजाभाव न करता सर्वांची कामे करणार आहोत.
ते म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत उर्वरीत कामांचा आम्ही आढावा घेणार आहोत. पणजी ई बस रायबंदर पर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे. पणजीतील वाहतूक कोंडीबाबत आम्ही पोलिस खात्याशी चर्चा केली आहे. रस्त्यावरील पडलेली भंगार वाहने काढण्यात येणार आहेत. मी कॅसिनोबाबतचे माझे मत आधीच स्पष्ट केले आहे. मात्र पर्यायी रोजगार संधी आणल्याशिवाय याविषयी अधिक बोलता येणार नाही. शहरातील समस्यांबाबत पुढील तीन महिन्यात एक उपायोजना तयार करून त्याबाबत लोकांची मते विचारात घेतली जाणार आहेत.
तो निर्णय पक्ष घेईल
रोहित म्हणाले की, मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी याआधीच मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र कोणत्या मतदारसंघातून लढणार याचा निर्णय पक्ष घेणार आहे.