
मडगाव: मडगाव नगरपालिका उद्यानातील जुनी वास्तू पाडून तिथे ३.९६ कोटी रुपये खर्चून दोन मजली इमारत बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला आता मडगावातून वाढता विरोध होत आहे. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी चिराग नायक यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे, तर प्रभव नायक यांनी जीएसआयडीसीला (GSIDC) पत्र लिहून या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे.
मडगाव पालिका इमारतीसमोरील उद्यानातील या जागेवर दरवर्षी मडगाव नगरपालिका सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. ही जागा मडगाववासीयांच्या श्रद्धेशी आणि परंपरेशी जोडलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दुमजली इमारत उभारण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते चिराग नायक यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना आता उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या मते, नव्याने केले जाणारे बांधकाम उद्यानाचे नैसर्गिक आणि ऐतिहासिक सौंदर्य नष्ट करेल. तसेच, या इमारतीचा वापर भविष्यात बार किंवा रेस्टॉरंटसारख्या व्यावसायिक कारणांसाठी केला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक जनतेला विश्वासात न घेता सुरू केलेला हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. मडगावात आधीच पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे; त्याशिवाय प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्यासारख्या समस्या प्रलंबित असताना, उद्यानात चार कोटी रुपये खर्चून नवी इमारत उभारणे चुकीचे आहे. पालिकेने या प्रकल्पाबाबत नागरिकांना योग्य माहिती द्यावी आणि सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रभव नायक यांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी जीएसआयडीसीला पत्र लिहून उद्यानातील बांधकामाची निविदा प्रक्रिया स्थगित करण्याची आणि प्रकल्पाबाबतची आवश्यक माहिती जनतेला देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, प्रकल्पाचा आराखडा पाहिल्यानंतर सर्वजण त्याचे कौतुक करतील. मडगाव पालिका मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, त्यांना आराखडा दाखवल्यानंतरच जीएसआयडीसीकडून पुढील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उपोषणस्थळी पोलीस
चिराग नायक यांनी उद्यानातील नव्या बांधकामाच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी मडगाव पोलिसांनी दाखल होऊन 'अशा प्रकारे बॅनर लावून किंवा सतरंजी अंथरून बसता येणार नाही' असे सांगत सतरंजी काढून घेतली.