लॉकडाउनच्या अफवा निराधार; देशात इंधनपुरवठा सुरळीत : मंत्री हरदीप सिंह पुरी

पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून स्वागत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21 mins ago
लॉकडाउनच्या अफवा निराधार; देशात इंधनपुरवठा सुरळीत : मंत्री हरदीप सिंह पुरी

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू होणार असल्याच्या अफवा पसरत असताना, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू (Minister for Petroleum and Natural Gas)  मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या सर्व अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. “भारतामध्ये लॉकडाउन (No lockdown in India) लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावरील (Social media)  ट्वीटर खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये पुरी यांनी सांगितले की, देशात इंधन, ऊर्जा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. “पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व परिस्थितींना सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी आणि इंधन पुरवठ्याबाबत चिंता वाढल्याने काही ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. 

अफवा पसरवू नयेत 

या पार्श्वभूमीवर पुरी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, अफवा पसरवू नयेत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “अशा संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरवणे हे  हानिकारक आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

जागतिक दरवाढीचा परिणाम, पण भारतात दिलासा

गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होऊन त्या सुमारे ७० डॉलर प्रति बॅरलवरून १२२ डॉलरपर्यंत पोहोचल्या. यामुळे जगभरात इंधन दरात २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र भारताने नागरिकांवरील भार कमी ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेतली आहे.

सरकारसमोर दोन पर्याय होते. दरवाढ थेट ग्राहकांवर टाकणे किंवा स्वतःच्या महसुलावर ताण घेऊन नागरिकांना दिलासा देणे. यापैकी दुसरा पर्याय निवडत सरकारने कर महसुलात मोठी तूट सहन केली असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

निर्यात कर आणि पुरवठा व्यवस्थापन

इंधनाच्या जागतिक दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उपलब्धता टिकवण्यासाठी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला स‌ीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात मोठी कपात जाहीर केली आहे. देशांतर्गत वापरासाठी पेट्रोल व डिझेलवर प्रत्येकी १० रुपये प्रति लिटरने कर कमी करण्यात आला असून, यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. तसेच डिझेलच्या निर्यातीवर २१.५ प्रति लिटर आणि एटीएफवर २९.५ प्रति लिटर कर लावण्यात आला आहे.

सरकार सज्ज, नागरिकांना आश्वासन

पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या या जागतिक संकटातही भारताने स्थिरता राखत नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.

अबकारी करातील कपातीचे स्वागत : मुख्यमंत्री डॉ. सावंत 

पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात १० रुपयांची कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant)  यांनी स्वागत केले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरापासून नागरिकांना दिलासा देण्याची सरकारची कटीबद्धता यातून सिद्ध होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

हेही वाचा