मी शंकराचा अवतार आणि तू माझी पार्वती.. म्हणत महिलेवर केला लैंगिक अत्याचार

अध्यात्माच्या आड पाशवी कृत्य करणारा आणखीन एक 'भोंदू' गजाआड; पुण्यातील घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
45 mins ago
मी शंकराचा अवतार आणि तू माझी पार्वती.. म्हणत महिलेवर केला लैंगिक अत्याचार

वसई/पुणे: अध्यात्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरूंचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत असून, आता 'आमची वसई' या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. त्याने 'मी शंकराचा अवतार आणि तू माझी पार्वती आहेस!' असे म्हणत एका ३५ वर्षीय महिलेवर अमली पदार्थ देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालघर आणि पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पीडितेने दाखवलेल्या हिमतीमुळे या भोंदू बाबाचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यात वास्तव्यास असून तिची ओळख २०२३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्य याच्याशी झाली होती. वैद्य याने स्वतःला धर्मगुरू आणि समाजसेवक म्हणून सादर केले होते. पीडितेच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत त्याने तिला अध्यात्माशी संबंधित गोष्टी शिकवण्याचे आमिष दाखवले आणि हळूहळू जवळीक साधली. डिसेंबर २०२३ मध्ये आरोपी पीडितेला भेटण्यासाठी पुण्यात गेला होता. तिथे त्याने स्वतःला साक्षात शंकराचा अवतार असल्याचे सांगून पीडितेची दिशाभूल केली. त्यानंतर तिला मांजरी येथील एका लॉजवर नेऊन कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीकारक पदार्थ दिला आणि तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.

केवळ शारीरिक अत्याचार करून आरोपी थांबला नाही, तर त्याने पीडितेचे अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच फोटोंचा धाक दाखवून त्याने मे २०२५ मध्ये तिला वसईतील 'हॉटेल एक्सप्रेस इन'मध्ये बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण समोर आल्यानंतर पीडितेने धीर एकवटला आणि आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर बुधवारी रात्री वसईतील माणिकपूर पोलीस स्थानकात आरोपी ऋषिकेश वैद्य विरोधात तक्रार देण्यात आली.

माणिकपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला. मात्र, अत्याचाराची पहिली घटना पुणे येथील मांजरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असल्याने, तांत्रिक कारणास्तव हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले असावे अशी शक्यता पीडितेने व्यक्त केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीच्या संस्थेच्या आडोशाने चालणाऱ्या इतर संशयास्पद हालचालींचीही चौकशी केली जात आहे.

हेही वाचा