
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिक येथे भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Karat) यांच्या लैंगिक शोषणाचे (Sex Scandal) अनेक व्हिडिओ व माहिती बाहेर येत असतानाच महाराष्ट्रात आणखी एका व्हिडिओने खळबळ माजली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री (Minister) तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा तृतीयपंथी व्यक्तीबरोबरचा अश्लील व्हिडिओ बाहेर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले असून, काॅंग्रेसने झिरवाळ यांना मंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
मंत्री झिरवाळ यांच्याबरोबर तृतीयपंथी पवन यादव व्हिडिओ मध्ये दिसत आहे. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात यादव याच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासींची मोठी संख्या असलेल्या मतदारसंघाचे झिरवाळ आमदार आहेत. सात महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ आता प्रसारित झाला आहे. तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्याबरोबर बिछान्यावर आहे व बाजूला मद्य आणि खाद्य आहे.
झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला दोन महिन्यांपूर्वी ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
या व्हिडिओ प्रकरणाची झिरवाळ यांना होती. झिरवाळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून यासंदर्भात चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर पक्षामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. काही मंत्री पदावर डोळा ठेवून असलेले झिरवाळ यांना लक्ष करीत असल्याचे पक्षामध्ये चर्चा आहे.
अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांनाच मिळायला हवे, अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते. झिरवाळ यांनी जाहीरपणे सांगितले होते की, दोन्ही राष्ट्रवादींचे अजित पवार यांनी विलीनीकरण करण्याचे ठरवले होते. व्हिडिओ बाहेर आल्यानंतर झिरवाळ चर्चेत आले आहेत व त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरणार आहेत.