चारित्र्यावरून खून; पतीला अटक

हैदराबाद (तेलंगणा) Telangana: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ३१ वर्षीय पतीने तिची निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना महबूबनगर परिसरात उघडकीस आली आहे. खून करून पत्नीचा मृतदेह शेतात टाकून दिला व तिच्या तीन वर्षांच्या मुलीला मृतदेहाजवळच सोडून पळ काढल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पती पी. नरसिंहुलू (वय ३१) हा टेंट हाऊसमध्ये काम करतो. त्याला पत्नीच्या (Wife) चारित्र्यावर संशय होता. शनिवारी रात्री त्याने पत्नीला जबरदस्तीने मद्य (Liquor) पाजले आणि मोठ्या दगडाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार मारले.
यानंतर संशयिताने मृतदेह चादरीत गुंडाळून मोटारसायकलवरून शादनगरमधील रंगारेड्डीगुडे गावाजवळील शेतात नेऊन टाकला. रविवारी सकाळी त्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला मृतदेहाजवळच सोडून घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, सकाळी सुमारे ८.३० वाजता स्थानिकांना मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे महिलेचा मृतदेह आणि बाजूलाच रडत असलेली चिमुकली आढळून आली. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयिताला लिंगमपल्ली येथून अटक केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.