फोंडा पोटनिवडणूक: 'आप'चे उमेदवार गीतेश नाईक यांचा अर्ज वैध

काँग्रेसने घेतलेली हरकत निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
12 mins ago
फोंडा पोटनिवडणूक: 'आप'चे उमेदवार गीतेश नाईक यांचा अर्ज वैध

पणजी: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार गीतेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाईक यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीवर घेतलेली हरकत निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर फेटाळून लावली. या निर्णयामुळे गीतेश नाईक यांच्या निवडणुकीच्या मार्गातील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे.  

काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात असा दावा करण्यात आला होता की, गीतेश नाईक यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राजस्थान आणि बंगळुरू येथे नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवली आहे. तसेच, कर्ज न फेडल्यामुळे जप्त झालेल्या मालमत्तेचा तपशीलही प्रतिज्ञापत्रात दिलेला नाही, असा आरोप काँग्रेसने केला होता. या हरकतीवर बुधवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा दावा फेटाळून लावत नाईक यांचा अर्ज वैध ठरवला.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निकालानंतर आम आदमी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'आप'चे राज्य निमंत्रक वाल्मिकी नाईक यांनी काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांना लक्ष्य करत जोरदार टीका केली. फेरेरा यांनी गीतेश नाईक यांच्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला जाईल, असा इशारा वाल्मिकी नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी उमेदवाराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा आरोपही पक्षाकडून करण्यात आला.

फोंडा पोटनिवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता फोंड्याच्या मैदानात त्रिकोणी संघर्ष निश्चित झाला आहे. भाजपचे रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकार आणि 'आप'चे गीतेश नाईक यांच्यात ही चुरशीची लढत होणार आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर आता प्रचाराचा जोर वाढणार असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या या प्रकारामुळे आगामी काळात फोंड्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा