बनावट प्रमाणपत्र दिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी : काँग्रेसची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
बनावट प्रमाणपत्र दिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी : काँग्रेसची मागणी

पणजी : मत्स्योद्योग खात्यात (Fisheries Department)  दोन कर्मचाऱ्यांनी आपली शैक्षणीक पात्रता दाखवताना बनावट शिक्षण संस्थांच्या (Educational Institute) प्रमाणपत्रांचा वापर केला आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी नोकरी व अन्य सुविधा मिळवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेस (Congress Party) शिष्टमंडळाने केली.

याबाबत बुधवारी त्यांनी मंत्री नीलकंठ हळर्णकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी साविओ डिसिल्वा, वीरेंद्र शिरोडकर, अर्चित नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.भेटी नंतर डिसिल्वा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, खात्यातील दोन कर्मचाऱ्यांनी झारखंड येथील एका शिक्षण संस्थेची प्रमाणपत्रे जोडून नोकरी मिळवली होती. ही शिक्षण संस्था अस्तित्वात नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे.

याबाबत एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने देखील निकाल दिला आहे. याआधी आम्ही जानेवारी महिन्यात हे प्रकरण बाहेर काढले होते. तसेच याविषयी दक्षता खात्याकडे तक्रार देखील दिली होती. दक्षता खात्याने मत्स्योद्योग खात्याला याबाबत एका महिन्यात उत्तर द्यावे असे सांगितले होते. मात्र एक महिना झाला तरी आम्हाला याचे उत्तर मिळालेले नाही. यासाठीच आज आम्ही मंत्र्यांना भेटण्यास आलो होतो. 

मंत्र्यांनी आम्हाला पुढील आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील मार्गांचा विचार करणार आहोत. खात्यातील हे दोन कर्मचारी सर्व्हेक्षक म्हणून अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी, पगार, बढती मिळवली आहे. राज्यात बेरोजगारी वाढत आहे.

पदवीधर युवा नोकऱ्या नसल्याने घरी बसून आहेत. अशावेळी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे.  त्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी डिसिल्वा यांनी केली.

हेही वाचा