कळंगुटमध्ये पर्यटकावर प्राणघातक हल्ला, हरमल किनाऱ्यावरील 'त्या' घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या..

पणजी : निसर्गरम्य किनाऱ्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या पर्यटनाला पुन्हा एकदा हिंसक कृत्यांचे गालबोट लागले आहे. उत्तर गोव्यातील गजबजलेल्या कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शॅक कर्मचाऱ्यांच्या एका टोळक्याने पर्यटकाला अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. या हल्ल्यात बंगळुरू येथील ४२ वर्षीय पर्यटक डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील पर्यटकांचा एक गट कळंगुट येथे सहलीसाठी आला होता. त्यांनी सर्वप्रथम समुद्रात स्नान केले. यानंतर ते किनाऱ्यावर शॅक्ससमोर असलेल्या खाटांवर जाऊन बसले. तेथील कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना तेथून जाण्यास सांगितले. दोन्ही गटांत बाचाबाची झाली. पाहता पाहता सुमारे १५ ते २० कर्मचाऱ्यांनी एका पर्यटकाला घेरले. या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी सळ्यांनी पर्यटकावर तुटून पडत त्याला बेदम मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात पर्यटकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या पर्यटकाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला आहे. गोव्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा कृत्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार संशयित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
विशेष म्हणजे, कळंगुटमधील ही घटना गेल्या वर्षी हरमल किनाऱ्यावर घडलेल्या एका दुर्दैवी खुनाची आठवण करून देणारी आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी हरमल येथील अमर बांदेकर या स्थानिक तरुणाचा शॅक कर्मचाऱ्यांनी किरकोळ वादातून खून केला होता. किनाऱ्यावर फिरत असताना वाटेत येणारी खुर्ची बाजूला सरकवल्याच्या साध्या कारणावरून शॅक कर्मचाऱ्यांनी अमरला इतकी बेदम मारहाण केली होती की, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
एका वर्षाच्या अंतराने पुन्हा एकदा तशाच प्रकारची हिंसक घटना घडल्याने पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शॅक व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जर पर्यटकांना आणि स्थानिकांना किनाऱ्यावर अशा प्रकारे दहशतीचा सामना करावा लागला, तर 'अतिथी देवो भव' या संकल्पनेला हरताळ फासला जाईल, अशी भीती पर्यटनप्रेमी व्यक्त करत आहेत. पोलीस आणि पर्यटन खाते आता या शॅक चालकांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर काय कडक निर्बंध घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.