४.८८ कोटींची मालमत्ता : गीतेश नाईक यांची ३.२० कोटींची, रितेश नाईक यांची १.५५ कोटींची मालमत्ता

पणजी : फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (by election of Ponda Assembly constituency) रिंगणात असलेले काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar Congress) हे सर्वांत श्रीमंत उमेदवार (rich candidate) ठरले आहेत. त्यांच्याकडे सुमारे ४.८८ कोटींची स्थावर आणि जंगम स्वरूपाची मालमत्ता आहे. ‘आप’चे गीतेश नाईक (Gitesh Naik AAP) यांनी सुमारे ३.२० कोटी रुपयांची, तर भाजपच्या रितेश नाईक (Ritesh Naik BJP) यांनी १.५५ कोटी रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार काँग्रेस उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी १.०८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये दहा बँक खात्यातील ठेवी, गुंतवणुकी, वाहने, दोन चारचाकी व एक दुचाकी वाहन, सोन्याचे चार पद्धतीचे दागिने आदींचा समावेश आहे, तर स्थावर मालमत्तेमध्ये बिगर कृषी जमीन, व्यावसायिक गाळे, फ्लॅट आदींचा समावेश आहे. या सर्वांची किंमत ३.८० कोटी रुपये आहे. डॉ. भाटीकर १.२९ कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यांनी २०२४-२५ मध्ये आयकर भरताना वार्षिक उत्पन्न १३.२५ लाख असल्याचे नमूद केले आहे.
भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांनी १.५५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम ५२ हजार रुपये, बँक ठेवी ७ लाख रुपये, म्युच्युअल फंडातील ७ लाख रुपये, पोस्ट आणि तत्सम गुंतवणूक १.८८ लाख रुपये, तर दागिने १.३८ कोटी रूपयांचे असल्याचे नमून केले आहे. त्यांच्या नावे स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे. त्यांनी २०२४- २५ मध्ये आयकर भरताना वार्षिक उत्पन्न १५.४६ लाख असल्याचे नमूद केले आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांनी सुमारे २.९३ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या मालमत्तेचा देखील समावेश आहे. यात चार बँक खात्यातील ठेवी, रोख रक्कम , एक चारचाकी, १२२ ग्रॅम सोने यांचा समावेश आहे, तर स्थावर मालमत्तेत प्लॉट आणि फ्लॅटचा समावेश आहे. गीतेश नाईक सुमारे २२.१९ कोटी रुपये देणे बाकी आहे. २०२४-२५ मध्ये आयकर भरताना वार्षिक उत्पन्न १०.९२ लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे.
केतन, रितेश पदवीधर, तर गीतेश बारावी उत्तीर्ण
- फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर हे सर्वाधिक उच्चशिक्षित आहेत, तर भाजप रितेश नाईक यांनी आपले शिक्षण परदेशात पूर्ण केले आहे. ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक यांची शैक्षणिक पात्रता तुलनेने कमी आहे.
- फोंडा पोटनिवडणुकीत तिन्ही उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. सर्वांत उच्चशिक्षित असलेले केतन भाटीकर हे फिजिओथेरपी विषयात पदव्युत्तर आहेत. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरू येथून हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
- भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात पदवी घेतली आहे. वर्ष २००२ मध्ये त्यांनी वेस्टर्न सिडनी मॅकआर्थर, ऑस्ट्रेलिया येथून हे शिक्षण पूर्ण केले. ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक हे सर्वांत कमी शिक्षित असून त्यांनी १९९९ मध्ये जी. व्ही. एम. उच्च माध्यमिक विद्यालय, फार्मागुडी-फोंडा येथून केवळ बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.