मत्स्यव्यवसायाला बसणार फटका : सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करण्याची मागणी

पणजी : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (war in gulf countries) हायस्पीड डिझेलच्या दरांनी (high speed diesel rate) उच्चांक गाठला आहे, ज्याचा अत्यंत वाईट परिणाम गोव्यातील यांत्रिक मासेमारी क्षेत्रावर (fishing) झाला आहे. डिझेलच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे चालू मासेमारी हंगाम वेळेपूर्वीच बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा गोवा मासेमारी बोट मालक संघटनेने सरकारला दिला आहे.
युद्धामुळे पेट्रोलियम आयातीवर परिणाम झाला असून त्यामुळे डिझेलचे दर वाढण्यासोबतच पुरवठ्यातही अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa chief minister Dr. Pramod Sawant), मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर (Minister of fisheries Nilkanth Halarnkar) आणि मत्स्यव्यवसाय सचिवांना सादर केलेल्या निवेदनात संघटनेने इंधनाच्या दरातील तफावतीबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे.
या वाढीव खर्चामुळे बोटी चालवणे आता परवडण्यापलीकडे गेले आहे. यांत्रिक मासेमारी क्षेत्र सध्या आपले कामकाज पूर्णपणे बंद करण्याच्या मनस्थितीत आहे. किरकोळ आणि घाऊक दरातील २४ रुपयांची ही तफावत बोट मालकांसाठी असह्य झाली आहे. पूर्वी जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा सरकारने मच्छिमारांना अधिकृत रिटेल आउटलेट्समधून इंधन घेण्याची सवलत दिली होती, तशीच सवलत आताही द्यावी, अशी मागणी जुझे फिलिप डिसोझा (Jose Philip D'souza) यांनी केली आहे.
गुजरात सरकारने मासेमारी क्षेत्रासाठी डिझेलचे दर प्रति लिटर २४ रुपयांनी कमी केले आहेत, तसेच इतर राज्यांनीही अशाच प्रकारची सवलत देण्याचे ठरवले आहे. राज्यातील यांत्रिक मासेमारी व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडू नये म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्वरित दखल घेऊन डिझेलच्या दरात सूट द्यावी, अशी विनंती डिसोझा यांनी केली आहे.
राज्यात डिझेलचे किरकोळ दर ८८ ते ८८.५० रुपयांच्या दरम्यान असताना, मासेमारी क्षेत्रासारख्या घाऊक ग्राहकांकडून मात्र प्रति लिटर ११२ रुपये इतका दर वसूल केला जात आहे.
- जुझे फिलिप डिसोझा, गोवा मासेमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष