गोवा : कुठ्ठाळी, केपे, कळंगुट मतदारसंघात टीबीचे सर्वाधिक रुग्ण

पाच वर्षांतील आकडेवारी : राज्यातील रुग्णांत ७.४४ टक्क्यांनी वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : कुठ्ठाळी, केपे, कळंगुट मतदारसंघात टीबीचे सर्वाधिक रुग्ण

पणजी : मागील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यातील टीबीच्या (tuberculosis bacteria TB patient) रुग्णांची संख्या ७.४४ टक्क्यांनी वाढली आहे. २०२१ मध्ये राज्यात टीबीचे १०७५ रुग्ण आढळले होते. २०२५ मध्ये ते वाढून ११५५ झाले. यादरम्यान मतदार संघनिहाय पाहता, कुठ्ठाळी येथे सर्वाधिक ३३० रुग्ण आढळले होते, तर केपेत ३१९ व कळंगुट मतदारसंघात टीबीचे ३१६ रुग्ण आढळले होते. सांत आंद्रे मतदारसंघात सर्वांत कमी १० रुग्ण आढळले होते, तर ताळगावमध्ये २२ रुग्ण आढळले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत मडगाव (२९०), पर्ये (२६३), पर्वरी (२२६), साखळी (२२३), म्हापसा (२२०), डिचोली (१८७), थीवी (१८३), मडकई (१७२), फोंडा(१६८), सावर्डे (१५४), शिरोडा (१५१) या मतदारसंघात टीबीचे रुग्ण तुलनेत अधिक होते, तर कुंभारजुवे (३४), बाणवली (५०), प्रियोळ (७१) येथे ही संख्या कमी होती. सध्या म्हापसा मतदारसंघातीळ सर्वाधिक ४६ रुग्ण टीबीसाठी उपचार घेत आहेत. यानंतर पर्वरीतील ४५, शिवोलीतील ४३, मडगावमधील ४१, तर वास्को आणि डिचोली मतदारसंघातील प्रत्येकी ४० रुग्ण टीबीसाठी उपचार घेत आहेत.

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ
टीबी निर्मूलन करण्यासाठी आरोग्य खाते विविध उपाय करत आहे. यासाठी ‘नॅट’सारख्या आधुनिक चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य खाते टीबीच्या उपचारासाठी आधुनिक पद्धतींचा वापर करत आहे. यामुळे वरील कालावधीत टीबीतून बऱ्या होणाऱ्या रुग्णाची संख्या देखील वाढली आहे. २०२१ मध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ८२.४१ होती. २०२१ मध्ये १०७५ पैकी ८८६ रुग्ण बरे झाले. २०२२ मध्ये ११५४ पैकी ९८६ रुग्ण, २०२३ मध्ये ११८९ पैकी १०४७ रुग्ण बरे झाले. २०२४ मध्ये १२१९ पैकी १०२९ (८४.४१ टक्के) रुग्ण बरे झाले.