इंधन टंचाईच्या अफवेने गोव्यात खळबळ; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा

तर गॅसअभावी हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27 mins ago
इंधन टंचाईच्या अफवेने गोव्यात खळबळ; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा

पणजी: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि संभाव्य इंधन टंचाईच्या भीतीपोटी गोव्यातील जनजीवन काहीप्रमाणात विस्कळीत झाले आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला असून, अनेक रेस्टॉरंट मालकांनी आता चक्क चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील परिस्थितीबाबत केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याने नागरिक 'पॅनिक मोड'वर गेले आहेत. काल रात्रीपासूनच राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः कळंगुट, बागा आणि मिरामार यांसारख्या किनारी भागांत १०० ते २०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. गोवा राज्यात इंधन स्वस्त असल्याने शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या पर्यटकांनीही आपल्या वाहनांमध्ये आणि कॅनमध्ये इंधनाचा साठा करण्यास सुरुवात केली आहे, यामुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गोव्यात ८ दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा उपलब्ध; इंधनाची टंचाई नाही. लोकांनी पेट्रोलपंपवर रांगा लावू नयेत. एलपीजी सिलिंडरचीही राज्यात कमतरता नाही :

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

इंधन टंचाईसोबतच आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा हॉटेल व्यवसायासाठी डोकेदुखी ठरला आहे. सध्या राज्याच्या वतीने केवळ २० टक्के व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. पर्यटनाचा हंगाम ऐन भरात असताना आणि रेस्टॉरंट्स पर्यटकांनी फुल्ल असतानाच गॅसचा साठा संपल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी काळ्या बाजारात एका सिलिंडरसाठी पाच ते सात हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जात आहे. मात्र, नागरी पुरवठा खात्याने कडक पावले उचलल्याने हा काळा बाजार रोखला गेला असला, तरी हॉटेलमधील गॅस शेगड्या आता थंडावल्या आहेत.



या संकटावर मात करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट मालकांनी आता पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत चुलीवर जेवण रांधण्यास सुरुवात केली आहे. बिर्याणी, डाळ, भात आणि रस्सा यांसारखे पदार्थ आता लाकडाच्या चुलीवर शिजवले जात आहेत. मात्र, गॅसची बचत करण्यासाठी स्टार्टर्स आणि वारंवार गॅस लागणारे पदार्थ अनेक ठिकाणच्या मेन्यू कार्डवरून गायब झाले आहेत. केवळ थाळी आणि बिर्याणीसारखे पदार्थ उपलब्ध करून दिले जात असून, इडली, समोसा आणि भाजी यांसारख्या खाद्यपदार्थांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एकूणच, इंधन आणि गॅसच्या या दुहेरी संकटामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाला मोठी झळ पोहोचत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.



हेही वाचा