
पणजी : गोव्यातील (Goa) ग्रामीण भागात ५ जी इंटरनेट (Internet) सुविधा असण्याचे प्रमाण राष्ट्रीय (National) सरासरी पेक्षा अधिक आहे. केंद्रीय दळणवळण खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यातील ३९२ पैकी ३०९ गावात (७८.२२ टक्के) ५ जी इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. याची राष्ट्रीय सरासरी ५७ टक्के इतकी कमी आहे. ग्रामीण भागातील ५ जी सुविधेच्या उपलब्धतेबाबत हरियाणा (Haryana) देशात आघाडीवर आहे. येथील ९७ टक्के भागात ही सुविधा उपलब्ध आहे. तर केरळमधील (Kerala) ९५ गावात अशी सुविधा आहे.
खात्याच्या अहवालानुसार, राज्यात एकूण ३९२ गावांचा ग्रामीण या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. यातील ३५५ (९० टक्के) गावात मोबाईल कव्हरेज आहे. तर ३७ (१० टक्के) गावात अद्याप मोबाईल कव्हरेज नाही. एकूण गावांपैकी ३२७ (८३ टक्के) गावात २ जी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
१३२ गावात (३४ टक्के) ३ जी सुविधा तर ३४५ गावात (८८ टक्के) ४ जी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. देशातील सर्व ग्रामपंचायतींना टप्प्याटप्प्याने ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी भारत नेट प्रकल्पाला सुरू करण्यात आला आहे. गोव्यात भारत नेट हा प्रकल्प राबवला जात नाही.
या प्रकल्पाअंतर्गत फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशभरातील २ लाख १७ हजार ८०५ ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा पुरवण्यात आली आहे. याशिवाय अन्य गावांना त्यांच्या मागणीनुसार इंटरनेट कनेक्टीव्हीटी दिली जात आहे. तसेच केंद्राच्या एबीपी या प्रकल्पाअंतर्गत फायबर पद्धतीचे इंटरनेट कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ४ जी सॅचुरेशन प्रकल्प आणि इतर मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रकल्पांअंतर्गत, फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशात २४ हजार २६३ मोबाईल टॉवर्स सुरू करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
राज्यात २ हजाराहून अधिक ५ जी बीटीएस
केंद्र सरकारने १ एप्रिल २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गोव्यात एकूण २,३१९ ५ जी बीटीएस स्टेशन बसवले आहेत. यादरम्यान संपूर्ण देशात २ लाखाहून अधिक ५ जी बीटीएस बसवले आहेत.