‘रेंट अ कार’ ऑपरेटरांकडून पर्यटकांची पिळवणूक; यापुढे कारवाई करणार : उपअधीक्षक गुरुदास कदम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 mins ago
‘रेंट अ कार’ ऑपरेटरांकडून पर्यटकांची पिळवणूक; यापुढे कारवाई करणार : उपअधीक्षक गुरुदास कदम

पणजी : ‘रेंट अ कार’ ऑपरेटरांकडून (Ren-A-Car) पर्यटकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येत असून, यापुढे अशा तक्रारी आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुरगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी बैठकीत दिला.

दाबोळी पोलीस स्थानकात (Dabolim Police Station)  उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी ‘रेंट अ कार’ ऑपरेटरांची बैठक घेतली.  त्यानंतर वरील माहिती दिली. यावेळी इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

गोव्यात (Goa)  येणारे पर्यटक (Tourist)  आपल्या सोयीसाठी ‘रेंट अ कार’ घेतात व फिरून झाल्यानंतर विमान पकडण्याच्या किंवा जाण्याच्या घाईगडबडीत असताना ‘रेंट अ कार’वाल्यांकडून कार परत करण्याच्या वेळी त्यांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे उपअधीक्षक कदम यांनी सांगितले. डिपॉझीट ठेवलेली रक्कम परत न करणे किंवा ज्यादा पैसे मागणे अशाप्रकारे सतावणूक केली जाते.

जाण्याच्या गडबडीत पर्यटक डिपॉझीट सोडून किंवा ज्यादा पैसे देऊन जात असतात. मात्र, नंतर गोव्याची बदनामी करतात व टॅक्सी वाल्यांनी कशाप्रकारे लुटले याची माहिती सर्वत्र पसरवतात.  पोर्टलवर तक्रारीही करतात. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाची नाहक बदनामी होते व त्याचा फटका टॅक्सी व्यवसायावरच होणार असल्याचे उपअधीक्षक कदम यांनी या बैठकीत त्यांना समजावून सांगितले.

यापुढे अशाप्रकारे तक्रारी आल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला. कदाचीत ‘रेंट अ कार’चे मालक हे प्रकार करीत नसले तरी; त्यांनी कार पाहण्यासाठी ठेवलेली माणसे आपल्या ‘पॉकेट मनी’साठी ज्यादा पैसे मागत असतात व असे प्रकार करतात असे उपअधीक्षक म्हणाले. मात्र, अशाप्रकारच्या तक्रारी यापुढे आल्यास मालकांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

‘रेंट अ कार’ ऑपरेटरनी दाबोळी विमानतळावर ज्यादा वेळ थांबून विमानतळ प्राधीकरणाचे शुल्क भरून व्यवसाय करीत असलेल्या टॅक्सी चालकांच्या व्यवसायात अडथळा आणू नये; तसे दिसून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलीस उपअधीक्षक कदम यांनी दिला. ‘रेंट अ कार’ ऑपरेटर संघटनेने आपले म्हणणे यावेळी मांडले. 

नियमांचे पालन करून वाहने हाका : उपअधीक्षक कदम 

दरम्यान, गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांनी मद्य प्राशन करून वाहने चालवू नयेत; नियमांचे पालन करून वाहने चालवावीत; असे आवाहनही उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी केले.