
बेंगळुरू/पुणे : महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील मृत्यूमागे कट असल्याचा गंभीर आरोप करत बेंगळुरूमध्ये नोंदवलेल्या पोलीस तक्रारीवरून ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
२३ मार्च रोजी अजित पवार यांचे पुतणे रोहित राजेंद्र पवार (Rohit Rajendra Pawar) यांनी केलेल्या तक्रारीवरून बेंगळुरूतील ‘हाय ग्राऊंड’ पोलीस स्थानकात ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. रोहित पवार यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकात तक्रार केली होती. मात्र, तेथे एफआयआर न नोंदवल्याने अखेर त्यांनी कर्नाटकातील बेंगळुरू पोलीस स्थानकात तक्रार केली.
२८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळानजीक लॅंडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला होता. संबंधित विमान हे बॉम्बारडीयर लियरजेट ४५ (Bombardier Learjet 45) प्रकारातील होते.
बेंगळुरू पोलीस स्थानकात रोहित पवार यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, हा विमान अपघात नसून एक मोठा गुन्हेगारी कट असल्याचा दावा करण्यात आला आहे. विमान सुरक्षा नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन, कागदपत्रांमध्ये फेरफार आणि अन्य संशयास्पद बाबींचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करून हा कट रचल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या ‘झिरो एफआयआर’मुळे प्रकरणाची चौकशी आता नव्या दिशेने होण्याची शक्यता असून, संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बेंगळुरू पोलीस स्थानकात नोंदवलेला ‘झिरो एफआयआर’ बारामती ग्रामीण पोलीस स्थानकात पाठवण्यात येणार असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.