
नाशिक: 'दैवी अवतार' असल्याचे भासवून आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या पापकर्माचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात खरातविरुद्ध लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल झाला असून, एका पीडित तरुणीने दिलेल्या धक्कादायक जबानीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उच्चभ्रू वस्तीत आलिशान कार्यालये थाटून चालणाऱ्या या 'काळ्या' साम्राज्याचा पर्दाफाश आता कायद्याच्या कचाट्यात झाला आहे.

या ताज्या प्रकरणात पीडित तरुणीने खरातच्या गुन्हेगारी पद्धतीचा पाढाच वाचला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबाची खरातशी ओळख एका खाजगी कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली होती. आपल्या शेतात घर बांधण्यापूर्वी आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी ही तरुणी पालकांसह खरातकडे गेली होती. याच विश्वासाचा फायदा घेत खरातने तिला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेच्या आरोपांनुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या काळात खरातने तिला गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केले. विशेष म्हणजे, यापूर्वी पीडितेने खरातचा 'ऑफिस बॉय' नीरज जाधव याच्याविरुद्ध अश्लील फोटो पाठवून त्रास दिल्याची तक्रार शिर्डी पोलिसांत दिली होती. मात्र, सखोल तपासात या संपूर्ण षडयंत्राचा सूत्रधार खुद्द अशोक खरातच असल्याचे आणि त्यानेच प्रत्यक्ष शोषण केल्याचे समोर आले आहे.
![]()
या एकंदरीत प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे. अशोक खरात स्वतःला दैवी अवतार असल्याचे सांगून महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. आध्यात्मिक विधीच्या नावाखाली तो महिलांना तीर्थ म्हणून स्वतःचे मूत्र पाजत असे, असा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. खरातची ही विकृती समाजासाठी घातक असून त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्वागत केले असून, अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा पुढे नेल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

नाशिक पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. धार्मिक भीती घालून किंवा अमली पदार्थांचा वापर करून खरातने आणखी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा शोध घेतला जात आहे. सात गुन्हे दाखल झाल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, पोलीस आता खरातच्या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या समर्थकांचीही चौकशी करत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील पुसट रेषेचा फायदा घेऊन वासनांध खेळ खेळणाऱ्या या 'कॅप्टन' खरातला आता कठोर कायदेशीर शिक्षेच्या सामोरे जावे लागणार आहे.
