दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवण्याची सलग दुसऱ्या दिवशी धमकी; दिल्लीत सुरक्षा वाढवली

सुरक्षायंत्रणा सतर्क

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 mins ago
दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवण्याची सलग दुसऱ्या दिवशी धमकी; दिल्लीत सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) विधानसभा (Assembly)  बॉम्बने (Bomb) उडवून देण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे (Email)  एकच खळबळ उडाली. या ईमेलच्या पार्श्वभूमीवर तातडीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. पोलिसांनी (Delhi Police) मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी अशी धमकी देणारा ईमेल मिळाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही धमकीची ईमेल विधानसभा अध्यक्षांचे ओएसडींना (OSD) पाठवण्यात आली. या ईमेलमध्ये विधानसभेत १६ आरडीक्स आधारित स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.  आणि दुपारी १:४० वाजता स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. यामध्ये काही राजकीय मागण्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलीस, बॉम्ब शोध पथक, गुन्हे शाखा, श्वानपथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली.  कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मंगळवारीही अशाच प्रकारच्या धमकीचा ईमेल विधानसभा अध्यक्षांना प्राप्त झाला होता.  त्याचप्रमाणे विधानसभा, मेट्रो स्थानक, लाल किल्ला तसेच काही शाळांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या. या सर्व घटनांमध्ये सखोल तपासानंतर कोणताही स्फोटके सापडली नसून; या धमक्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले होते.

धमकीच्या ईमेलमध्ये प्रमुख नेत्यांची नावे 

पोलिसांच्या माहितीनुसार, या धमकीच्या ईमेलमध्ये काही प्रमुख नेत्यांची नावेही नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, तसेच इतर नेत्यांचा समावेश आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात अशा ५०० हून अधिक धमकीच्या घटना समोर आल्या असून; अलीकडील काळात अशा प्रकारच्या घटनांत वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे.



हेही वाचा