आंध्रप्रदेशातील रायावरम येथे बस आणि ट्रकची धडक; लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू

२५ पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
आंध्रप्रदेशातील रायावरम येथे बस आणि ट्रकची धडक; लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू

अमरावती : आंध्रप्रदेशातील मारकापुरम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण घटना घडली.  रायवरम जवळ प्रवाशांनी भरलेली बस आणि खडीने भरलेला टिप्पर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ही आग इतकी रौद्र होती की बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही व १५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात सुमारे २५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.


bus collided with lorry


मिळालेल्या माहितीनुसार, मारकापुरम जिल्ह्यातील रायवरम परिसरातून जात असताना भरधाव बस आणि समोरून येणाऱ्या टिप्पर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की काही सेकंदांतच दोन्ही वाहनांच्या इंधन टाकीचा स्फोट झाला.  बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता, तर मागच्या बाजूला असलेल्या प्रवाशांना आगीच्या ज्वाळांनी वेढले. धुराचे लोट आणि आगीच्या लपट्यांमुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा गुदमरून आणि होरपळून जागीच अंत झाला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेऊन खिडक्या फोडून काही प्रवाशांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.



मारकापुरमचे पोलीस उपाधीक्षक नागराजू यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, आतापर्यंत १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना विशेष बर्न युनिटमध्ये हलवण्यात आले आहे. बसच्या मलब्याखाली अजूनही काही मृतदेह अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून क्रेन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.



आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना प्रकट केल्या असून जिल्हा प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातामुळे मारकापुरम परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने हा अपघात घडल्याचे समजते, मात्र पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

हेही वाचा