जीवनशैलीत छोटे बदल करा, मोठ्या आजारांचा धोका टाळा : संशोधन

ह्रदयविकार, स्ट्रोकचा धोकाही टळू शकतो

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
जीवनशैलीत छोटे बदल करा, मोठ्या आजारांचा धोका टाळा : संशोधन

 सोफिया अँटिपोलिस

फ्रांस : हृदयविकाराचा झटका (Heart attack), स्ट्रोक (Stroke)  यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी मोठे बदल आवश्यक नसून, दैनंदिन जीवनातील छोटे-छोटे सुधारणा अधिक प्रभावी ठरू शकतात, असे नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

 युके येथे ५३ हजारांहून अधिक प्रौढांवर आठ वर्षे करण्यात आलेल्या या अभ्यासात झोप, आहार आणि शारीरिक हालचालींमध्ये एकत्रितपणे केलेल्या किरकोळ बदलांचा मोठा आरोग्यदायी परिणाम दिसून आला.

संशोधनानुसार (Research), दररोज फक्त ११ मिनिटे अधिक झोप, ४.५ मिनिटे अधिक मध्यम ते तीव्र व्यायाम, आणि एक चतुर्थांश कप अधिक भाज्यांचे सेवन केल्यास हृदयविकाराशी संबंधित मोठ्या घटनांचा धोका सुमारे १० टक्क्यांनी कमी होतो.

तसेच, दररोज ८ ते ९ तास झोप, किमान ४२ मिनिटे व्यायाम आणि संतुलित आहार ही आदर्श जीवनशैली ठरते. अशा सवयी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका तब्बल ५७ टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले.

या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. निकोलस कोमेल यांनी सांगितले की, “मोठे बदल करण्याऐवजी छोट्या सुधारणा एकत्रितपणे करणे अधिक सोपे आणि दीर्घकाळ टिकणारे ठरते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.”

संशोधनात झोप, आहार आणि व्यायाम यांचा परस्पर संबंधही अधोरेखित करण्यात आला आहे. कमी झोपेमुळे भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो.  तर नियमित व्यायाम झोपेची गुणवत्ता सुधारतो. याशिवाय, संतुलीत आहार शरीराला आवश्यक ऊर्जा देऊन शारीरिक हालचालींना मदत करतो.

तज्ज्ञांच्या मते, हा अभ्यास निरीक्षणात्मक असल्याने थेट कारण-परिणाम संबंध निश्चित करता येत नाही. मात्र, भविष्यातील अधिक संशोधनातून या निष्कर्षांना अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.




हेही वाचा