
तेहरान : अमेरिका–इझ्रायल (USA-Israel) आणि इराण (Iran) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा आज २७वा दिवस असताना, इराणने भारतासह (India) पाच देशांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास मर्यादित परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.
एका भारतीय वृत्तसंस्थेने मुंबईतील (Mumbai) इराणी दूतावासाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत, चीन (China), रशिया (Russia), इराक आणि पाकिस्तान (Pakistan) या देशांना विशिष्ट अटींसह होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘मित्र राष्ट्रां’साठी ही सवलत असल्याचे स्पष्ट केले.
अटींचे पालन करून मार्गाचा वापर करावा : इराण
इराणने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. मात्र, इराणविरोधी भूमिका घेणाऱ्या देशांसाठी हा मार्ग प्रतिबंधित ठेवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. इतर देशांना आवश्यक अटींच्या अधीन राहूनच या मार्गाचा वापर करता येणार आहे.
इराणने अमेरिकेचे फायटर जेट पाडले
दरम्यान, बुधवारी रात्री इराणने मोठी लष्करी कारवाई केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या माहितीनुसार, अमेरिकेचे एफ/ए-१८ फायटर जेट पाडण्यात आले असून ते हिंदी महासागरात कोसळल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई इराणच्या दक्षिणेकडील सागरी क्षेत्रात करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.