कुडचडे प्रकरण संवेदनाशील असल्यानेच क्राईम ब्रॅंचकडे : डीजीपी आलोक कुमार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26th March, 01:15 pm
कुडचडे प्रकरण संवेदनाशील असल्यानेच क्राईम ब्रॅंचकडे : डीजीपी आलोक कुमार

पणजी : गोव्यातील (Goa)  कुडचडे (Curchorem) लैंगिक अत्याचार प्रकरणी तपासाचे काम मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. प्रकरण संवेदनशील असल्यानेच ते क्राईम ब्रँचकडे (Crime Branch) देण्यात आले आहे. या प्रकरणी योग्य पद्धतीने तपास केला जात आहे. तपासाबाबत कुणीही कसलीही शंका घेऊ नये; असे प्रतिपादन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी केले.

गुरुवारी भारतीय न्याय संहितेबाबत आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आलोक कुमार म्हणाले की, कुडचडे प्रकरणात पीडितांची ओळख कळू नये; यासाठी काळजी घेतली जात आहे. पोलीस स्थानकात (Police station)  अनेक लोक ये जा करत असतात. अशावेळी या प्रकरणाचा तपास सुरू असेल तर पीडितांची ओळख कळण्याची शक्यता होती. 

याचा विचार करून देखील प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्यात आले आहे. याआधीही अशी मोठी प्रकरणे क्राईम ब्रँचकडे देण्यात आली आहेत. क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास तत्परतेने आणि योग्य पद्धतीने करत आहे.  

भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीत गोवा आघाडीवर 

तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात आलोक कुमार यांनी भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीत गोवा देशात आघाडीवर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सर्व राज्यांची क्रमवारी काढली जाते. मागील ५ महिन्यांपूर्वी गोवा या क्रमवारीत १९ व्या स्थानी होता.

पोलीस, आरोग्य, न्याय, अभियोग, तुरुंग प्रशासन अशा सर्व खात्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे आज गोवा या क्रमवारीत प्रथम स्थानावर पोहोचला आहे. ही आमच्याही अभिमानाची गोष्ट आहे. येथील प्रदर्शनात गुन्ह्यापासून ते न्यायालयीन निवाडा ही प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आहे.

हेही वाचा