आधुनिक तंत्रज्ञानामुळे गोव्यात न्यायदानाची प्रक्रिया होणार जलद : मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30 mins ago
आधुनिक तंत्रज्ञानामुळे गोव्यात न्यायदानाची प्रक्रिया होणार जलद : मुख्यमंत्री

पणजी: मागील काही वर्षांत राज्य सरकारने न्यायदानाशी संबंधित खात्यांचे आधुनिकीकरण केले आहे. पोलीस, अभियोग (Prosecution) आणि न्यायपालिका या खात्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणले आहे. याचाच एक भाग म्हणून वेर्णा येथील अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅबचे लवकरच उद्घाटन करण्यात येईल. या सर्व सोयींमुळे गुन्ह्यांचा तपास आणि न्यायदानाची प्रक्रिया जलद गतीने होईल," असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी कला अकादमी येथे 'भारतीय न्याय संहिते'बाबत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही पोलीस खात्याला नवे तंत्रज्ञान देण्यासोबतच पायाभूत सुविधांमध्येही वाढ केली आहे. फॉरेन्सिक विभागाला नवीन उपकरणे देण्यात आली असून, अभियोग खात्याच्या कार्यालयासाठी नुकतीच नवीन जागा उपलब्ध करून दिली आहे. या सर्व सुधारणांमुळे प्रलंबित खटले लवकर निकाली लागतील, अशी अपेक्षा आहे. कला अकादमी येथील प्रदर्शनात गुन्ह्याच्या तपासापासून ते न्यायालयीन निवाड्यापर्यंतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन नक्की पहावे, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल.

ते पुढे म्हणाले की, प्रदर्शनात फॉरेन्सिक विभागाचे काम कसे चालते याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे देशातील जुनी कायदेसंहिता बदलून नवीन संहिता लागू झाली आहे. वसाहतवादी दृष्टिकोनातून तयार केलेले कायदे रद्द करून सध्याच्या काळानुरूप नवीन कायदे आणण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी सर्वप्रथम गोव्यात झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

हेही वाचा